नवी दिल्ली,
world's attention is on the BRICS summit भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी ते उपस्थित राहू शकतात. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतरचा हा त्यांचा पहिला भारत दौरा ठरण्याची शक्यता असून, या घडामोडीकडे दोन्ही देशांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे.शी जिनपिंग २०१३ पासून चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी तीन वेळा भारताला भेट दिली असून, त्यांचा शेवटचा दौरा ऑक्टोबर २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर काही महिन्यांतच पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत-चीन सैन्यामध्ये गलवान संघर्ष झाला. या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण बनले आणि सीमावाद अधिक तीव्र झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार, शी जिनपिंग यांच्या संभाव्य भारत दौऱ्यापूर्वी भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उच्चस्तरीय चर्चेसाठी चीनला भेट देण्याची शक्यता असून, या दौऱ्याच्या तारखा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, भारत-चीन सीमा प्रकरणांवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यप्रणालीची (WMCC) बैठकही येत्या काही आठवड्यांत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सीमावादावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चर्चा अपेक्षित आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नावर पुढील वाटचालीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
जर शी जिनपिंग यांनी भारत दौरा केला, तर तो केवळ ब्रिक्स शिखर परिषदेपुरता मर्यादित राहणार नाही. जवळपास सहा वर्षांनंतर ते भारतात येणार असून, गलवान संघर्षानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा असेल. त्यामुळे या परिषदेदरम्यान भारत आणि चीनच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये द्विपक्षीय बैठक होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाव्य बैठकीत सीमावाद, प्रादेशिक सुरक्षा, आर्थिक सहकार्य तसेच भारत-चीन संबंधांच्या भविष्यातील दिशेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कविषयक धोरणांमुळे निर्माण झालेली जागतिक आर्थिक आव्हाने आणि पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपानंतरची अस्थिर परिस्थिती या पार्श्वभूमीवर ही भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे.