पिंपळगाव सराई
mother-parent meet विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि शाळा-पालक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने जनता विद्यालय व कनिष्ठ कला-विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव सराई येथे आयोजित करण्यात आलेला माता-पालक मेळावा पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
mother-parent meet कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपालीताई केशव तरमळे, सरपंच, पिंपळगाव सराई या विराजमान होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या नीताताई गजानन जोशी, विभाग कार्यवाहिका, राष्ट्रसेविका समिती, खामगाव व बुलढाणा जिल्हा यांनी आपल्या ओजस्वी, विचारप्रवर्तक आणि संस्कारमूल्यांनी परिपूर्ण मार्गदर्शनातून उपस्थित पालकांची मने जिंकली.
mother-parent meet आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, मुलाचे पहिले विद्यापीठ म्हणजे त्याचे घर आणि पहिली गुरु म्हणजे त्याची आई. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि समाज यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व विश्वासाचे नाते निर्माण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मुलांमध्ये शिस्त, नैतिक मूल्ये, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालवून त्यांच्या भावविश्वाला समजून घेण्याचे आवाहन केले. तसेच मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी वाचनसंस्कृती, क्रीडा आणि संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
mother-parent meet वंदना कृष्णा लकडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शाळेचे प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळा आणि पालक यांचे समान योगदान असते. शिक्षक ज्ञान देतात, तर पालक संस्कार देतात. या दोघांच्या समन्वयातूनच आदर्श विद्यार्थी घडतो.
mother-parent meet शाळेचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, अभ्यासातील सातत्य, शिस्त, वेळेचे नियोजन आणि पालकांच्या सकारात्मक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक यशामध्ये पालकांची प्रेरणा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्या म्हणून निर्मला खुर्दे, मुख्याध्यापिका, जनता प्राथमिक विद्यालय, पिंपळगाव सराई या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मीनल अवचार यांनी केले, तर वैशाली मांजाटे यांनी आभार मानले.