अभिषेक शर्मासमोर दुहेरी विक्रमाची संधी

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
मँचेस्टर,
abhishek sharma भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आता रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः भारतीय युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी करत त्याने आपला फॉर्म दाखवून दिला होता, आणि आता दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडे दोन मोठे विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.
 
abhishek sharma
 
अभिषेकने इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत सात सामन्यांत प्रभावी खेळ करत ३४७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्ध त्याच्या नावावर आधीच २६ षटकार जमा झाले आहेत. दुसऱ्या सामन्यात अभिषेकने फक्त दोन षटकार ठोकले, तर तो हार्दिक पांड्या याचा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडेल. सध्या हार्दिकच्या नावावर २७ षटकार असून अभिषेक त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. त्यामुळे हा विक्रम मोडण्यासाठी त्याला फार मोठ्या खेळीची गरज नाही.
 
याशिवाय, अभिषेक आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याजवळ उभा आहे. त्याने दुसऱ्या सामन्यात १४ धावा केल्या तर तो सूर्यकुमार यादव याला मागे टाकत इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचेल. सध्या इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक टी-20 धावा करण्याचा विक्रम विराट कोहली यांच्या नावावर आहे. मात्र युवा अभिषेक ज्या वेगाने धावा आणि षटकारांची बरसात करत आहे, ते पाहता आगामी सामन्यात तो आणखी एक मोठा टप्पा गाठू शकतो. त्यामुळे मँचेस्टरमधील हा सामना अभिषेक शर्मासाठी अत्यंत खास ठरणार आहे.