चोवीस वर्षांपासून फरार आरोपीला अटक

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
ओळख लपवून पोलिसांना देत होता चकमा

अनिल कांबळे
नागपूर,
Absconding accused arrested शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी गेल्या चोवीस वर्षांपासून स्वत:ची खरी ओळख लपवून पोलिसांना चकमा देत होता. अखेर सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने अरोपीवर पाळत ठेवून त्याला कळमेश्वर तालुक्यातून ताब्यात घेतले. संजय मनोहर पेटकर ( यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
farar dadk
प्राप्त माहितीनुसार, आरोपी संजय पेटकर याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, कामात अडथळा आणणे या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा केल्यापासून म्हणजेच गेल्या २४ वर्षांपासून आरोपी आपली ओळख लपवून वावरत होता आणि न्यायालयासमोर हजर राहणे टाळत होता. या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपीला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयासमक्ष हजर राहण्याबाबतचे कडक आदेश जारी केले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीबाबतची सर्व जुनी आणि नवीन माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याचा कसोशीने शोध घेतला असता, तो सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मसेपठार या गावात आला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मसेपठार गावात सापळा रचला आणि त्याच्या हालचालींवर बारीक पाळत ठेवली.

न्यायालयापुढे केले हजर
४ जुलै रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास पोलिसांनी घेराव घालून आरोपीला ताब्यात घेतले. चोवीस वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या या आरोपीला कायदेशीर प्रक्रियेनंतर तातडीने जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.