उत्तम टॉकीज मार्गावर नागरिकांना नरकयातना

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
जलमय खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त

आर्णी, 
Amni Asra Road शहरातील उत्तम टॉकीज आमनी आसरा रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले ते पाण्याने भरल्यामुळे नागरिकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. डास व दुर्गंधाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
 
 
rasta
 
आर्णी हे तालुक्याचे मुख्यालय असतानाही शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता हे तालुक्याचे ठिकाण की एखादे दुर्लक्षित गाव, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील अनेक भागांत रस्त्यांची अवस्था बिकट असून नाल्या तुंबल्या आहेत. ठिकठिकाणी कचèयाचे ढीग साचले आहेत. मात्र, फक्त भिंतीवर ‘स्वच्छ आर्णी, सुंदर आर्णी’ अशा घोषणा रंगवून विकास झाल्याचे चित्र उभे करण्यात आल्याची टीका नागरिक करत आहेत.
 
 
 
उत्तम टॉकीज, आमनी आसरा रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यावरून अमराईपुरा, शास्त्रीनगर, झोपडपट्टी परिसर तसेच आमणी आसरा या भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा असते. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्डे दिसत नाहीत आणि अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक दुचाकीस्वार घसरून किरकोळ जखमी झाल्याच्या घटनाही घडत आहेत. नागरिकांनी आर्णी नगर परिषद प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून जलनिस्सारणाची व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.