दुसऱ्या पतीने घडविले भाग्यश्री हत्याकांड

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
कामठी जवळील घोरपड-शिरपूर रस्त्यावर केला होता खून
अनिल कांबळे
 
नागपूर, 
Bhagyashree massacre नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपड ते शिरपूर रस्त्यावर झालेल्या भाग्यश्री विनोद रजक (३५) यांच्या निर्घृण हत्याकांडाचा गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने उलगडा केला. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा दुसरा पती आरोपी राजेंद्र नत्थुजी कोटरुंगे (४५, नांदगाव येसंबा, तालुका पारशिवनी) याला अटक केली आहे.
 
 
hatya
 
माहितीनुसार, भाग्यश्री यांचा पहिला विवाह वर्ष २०१० मध्ये विनोद रजक (रा. जबलपूर) याच्याशी झाला होता. मात्र, तो दारूच्या नशेत चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत असल्याने त्या नव-याला सोडून माहेरी गादा (कामठी) येथे राहू लागल्या. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी राजेंद्र कोटरुंगे याच्याशी मंदिरात दुसरे लग्न केले. परंतु, राजेंद्रनेही मारहाण सुरू केल्यामुळे त्या त्यालाही सोडून आपली बहीण सरिता खुरपडी यांच्याकडे राहून खाजगी काम करत होत्या. दरम्यान, राजेंद्र हा नेहमी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि माहेरी जाऊन घरी चल म्हणून त्रास द्यायचा. हा वाद गादा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पोलिस पाटील यांच्याकडेही गेला होता. तेथे राजेंद्र वापरत असलेल्या दुचाकीचे मासिक हप्ते भाग्यश्री भरत असल्यामुळे त्यांनी गाडीची चावी हिसकावून घेतली होती. याच रागातून राजेंद्रने भाग्यश्रीला पाहून घेण्याची धमकी दिली होती. २ जुलै रोजी सायंकाळी नेहमीच्या वेळेत भाग्यश्री घरी न परतल्याने बहीण सरिता या शोधार्थ निघाल्या. दरम्यान, घोरपड ते शिरपूर रस्त्यावर भाग्यश्री या रक्तबंबाळ आणि मृत अवस्थेत आढळून आल्या. धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बडनेरा रेल्वेस्थानातून आरोपीला अटक
घटनेच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राजेंद्र हा बडनेरा येथे असल्याची खात्री केली. तेथून तो रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.