मुंबई,
Eknath Shinde admitted to hospital राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण, बैठका आणि राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला होता. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शुक्रवारी त्यांना ताप आला तसेच अशक्तपणाही जाणवू लागला. त्यामुळे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात शुक्रवारी दुपारी धुळ्यातील शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील सहा खासदार आणि विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांच्याशी संबंधित राजकीय हालचालींमुळे शिंदे गट सतत चर्चेत होता. या सर्व घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक बैठका घेतल्या तसेच दिल्ली दौरेही केले. या धावपळीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पुढे ढकलण्यात आलेला शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अखेर शुक्रवारी रात्री २ वाजता पार पडला. खासदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत जवळपास ५० हजार मते मिळवली होती.