Electricity poles fell in the rain मार्डी ते चिंचमंडळ-खैरी दरम्यान नुकतेच नवीन विजेचे खांब उभे करण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात या विजेच्या खांबाची गुणवत्ता स्पष्ट दिसून आली. पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या खांबापैकी जवळपास 25 खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
वडकी ते मार्डी दरम्यान 33/11 केव्हीचे वीज जोडणीचे काम सुरू आहे. या जोडणीचे काम अशोका बिटकॉन या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीला वडकी ते मार्डी दरम्यान विजेचे खांब उभे करण्याचे काम दिलेले आहे. या कंपनीने रस्त्याच्या बाजूला विजेचे खांब उभे केले. परंतु कामाच्या कमकुवत दर्जामुळे विजेचे खांब हे पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात जमीनदोस्त झाले.
या रस्त्याने जवळपास 24 ते 25 विजेचे खांब पडले आहेत. यावरूनच या कामाचा दर्जा लक्षात येतो. काही खांब हे नालीच्या कडेला लागूनच उभे करण्यात आलेले आहे. तर काही खांब हे पूर्णपणे योग्य रीतीने खड्डा करून काँक्रिटमध्ये उभे न केल्यामुळे तेसुद्धा जमीनदोस्त झाले आहेत. तर दहा ते पंधरा खांब हे वाकलेल्या अवस्थेत आहेत.
हे विजेचे खांब उभे करण्याच्या कामाला चार ते पाचच महिने झालेले आहेत आणि साधारण पाऊस पडलेला आहे. मोठा वादळवारा नव्हता, तरीही एवढ्या कमी कालावधीत उभे केलेले खांब कोसळल्याने कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या कामाकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. कोणतेही काम सुरू असताना संबंधित विभागाने या कामाच्या दर्जाकडे लक्ष देणे गरजेचे होते. 20 ते 25 विजेचे खांब कोसळणे ही एक साधी बाब नसून हे संबंधित विभागाचे अपयशच मानले जाते. संबंधित ठेकेदार आणि त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी आहे.