अखेर मुहूर्त सापडला, शहरातील अतिक्रमणे झाले भुईसपाट
दिनांक :04-Jul-2026
Total Views |
धानोरा,
Encroachment-free Dhanora शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे येथील नागरिकांना रस्त्यावरून चालणे आणि दुचाकी चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले होते. याबाबत वारंवार बोंबाबोंब होत होती. मात्र प्रशासन हलत नव्हते. अखेर नगरपंचायत प्रशासनाला याचा मुहूर्त सापडला आणि एकाच झटक्यात शहरातील अतिक्रमण भुईसपाट केले. शहराच्या सौंदर्याला आणि सुरक्षिततेला बाधा आणणार्या या विळख्यातून मुख्य बाजारपेठेला मुक्त करण्यासाठी नगरपंचायतने शुक्रवारी अत्यंत धडक पाऊल उचलले. थेट रस्त्यावर उतरून क्शन मोडमध्ये आलेल्या मुख्याधिकारी प्रितीश मगरे यांच्या या धाडसी भूमिकेमुळे वर्षानुवर्षांपासून रखडलेला रस्ते रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
3 जुलैला शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून शहरात या हायव्होल्टेज मोहिमेला सुरुवात झाली. नगरपंचायतचे विशेष पथक, जेसीबी, ट्रॅक्टर आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेत दाखल झाले. तहसीलदार गणेश माळी आणि सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चौक, बसस्थानक परिसर, तहसील कार्यालय रस्ता आणि आठवडी बाजार परिसरातील रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत व्यवसाय, पत्र्यांचे शेड आणि दुकानदारांनी रस्त्यावरच केलेले पक्के बांधकाम यात कोणाचीही हयगय न करता जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेदरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपंचायतीचे बांधकाम विभागप्रमुख मंगेश नाकाडे, अभियंता वीणा सहारे, कर निरीक्षक व सफाई कर्मचार्यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. या ऐतिहासिक कारवाईनंतर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा वाहतुकीचा त्रास दुर झाला आहे.