लाकडी खांबांच्या आधारावर चालतोय वीजपुरवठा

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
रंगय्यापल्ली, 
Georgepeta: Mahavitaran Power Supply गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात विकासकामांच्या नावाने प्रशासन किती ‘अंधारात’ आहे, याचे जार्जपेटा हे गाव जिवंत उदाहरण बनले आहे. ग्रामपंचायत बेजुरपल्लीअंतर्गत येणार्‍या या अतिदुर्गम गावातील नागरिकांना महावितरणच्या गलथान कारभारामुळे साक्षात मृत्यूशी खेळत वीज वापरावी लागत आहे. गावात सिमेंटचे खांब किंवा अधिकृत वीज वाहिनी काही ठिकाणी नसल्याने, गावकरी स्वतःच्या जीवावर उदार होऊन लाकडी खांब रोवून त्यावर वीज तारांचा ‘जाल’ पसरवत आहेत.
 
 
Mahavitaran
 
जार्जपेटा येथील सद्यस्थिती हृदय पिळवटून टाकणारी आहे. घरांच्या परिसरातून आणि शेतातून लाकडाच्या ओंडक्यांच्या आधाराने गेलेल्या या उघड्या वीज तारा कोणत्याही क्षणी भीषण संकटाला आमंत्रण देऊ शकतात. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत हे लाकडी खांब ओले होऊन वीज प्रवाहामुळे कधीही मृत्यूचा निमंत्रण ठरू शकतात. गावात राहणार्‍या निष्पाप नागरिकांच्या जीवापेक्षा प्रशासनासाठी दुसरी कोणती महत्त्वाची कामे आहेत? असा प्रश्‍न नागिरकांमध्ये उपिस्थत केला जात आहे. वीजवितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात येत असूनही, या भागाला आधुनिक युगातील वीज सुविधांपासून वंचित ठेवणे, ही प्रशासकीय लाजिरवाणी बाब आहे. आजवर या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. प्रशासनाने आता झोपेतून जागे होऊन जार्जपेटातील या जीवघेण्या वीज प्रणालीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा भविष्यात होणार्‍या कोणत्याही जीवितहानीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.