मुंबई
ghabadkund मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांच्या तगड्या स्पर्धेतही ‘घबाडकुंड’ने बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. रहस्य, थरार आणि भय यांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवले आहे. दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस या चित्रपटाने ८.१० कोटी रुपयांची कमाई नोंदवली असून, तिसऱ्या आठवड्यातही त्याची यशस्वी घोडदौड कायम असल्याचे चित्र आहे.
‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’ आणि ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटांसह हिंदी व हॉलिवूडमधील अनेक बिग बजेट चित्रपट सध्या प्रदर्शित असतानाही ‘घबाडकुंड’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे आणि प्रभावी मांडणीच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे हाऊसफुल शो सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम असल्याचे दिसून येत आहे.
उत्कंठावर्धक कथा, प्रभावी दिग्दर्शन, ghabadkund कलाकारांचा दमदार अभिनय, प्रभावी पार्श्वसंगीत, दर्जेदार तांत्रिक मांडणी आणि रहस्यपूर्ण वातावरण या सर्व बाबींमुळे ‘घबाडकुंड’चे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. सकारात्मक ‘वर्ड ऑफ माऊथ’चा मोठा फायदा चित्रपटाला होत असून, अनेक ठिकाणी शोची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर आगाऊ तिकीट बुकिंगलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.कुटुंबीय, मित्रमंडळी तसेच विविध ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत. तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपटाला उत्कृष्ट रेटिंग मिळाले असून, सोशल मीडियावर ‘घबाडकुंड’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या यशामुळे दर्जेदार मराठी चित्रपटांबद्दल प्रेक्षकांचा वाढता विश्वासही अधोरेखित झाला आहे.‘आयकॉन द स्टाईल’चे निर्माते डॉ. रसिक कदम निर्मित आणि प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित ‘घबाडकुंड’ तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. रहस्य आणि थराराचा वेगळा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे येत असून, आगामी दिवसांतही चित्रपटाची यशस्वी घोडदौड कायम राहील, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.