पाऊस, वादळ अन् अतिवृष्टी; राज्यात अलर्ट जारी

फडणवीसांचे सतर्कतेचे आवाहन

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Heavy rainfall in the state राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला असून मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा धोका कायम आहे. हवामान खात्याने 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, ठाणे, रायगड, पालघर, पुण्याचा काही भाग आणि नाशिक येथे जोरदार पाऊस सुरू आहे. या सर्व भागांमध्ये पुढील काही दिवस सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी अलर्ट जारी करण्यात येत आहेत.प्रशासन दर तीन तासांनी नागरिकांना एसएमएसद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सतर्क ठेवण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 
 

swe
 
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र आहे. पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातही जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी कंबरेइतके पाणी साचले आहे. दुपारी समुद्राला भरती आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवार, 4 जुलै 2026 रोजी मुंबईतील सर्व महापालिका आणि संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सकाळच्या सत्रासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अलर्टकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.