टोल वसुलीत अव्वल, सुविधांमध्ये शून्य

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
वडकीतील सेवा रस्ता आणि लहान बोगदा बनला मृत्यूचा सापळा
महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा कळस

राळेगाव, 
Highway Authority राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वडकी परिसरातील सेवा रस्ता आणि लहान बोगद्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करणाèया यंत्रणेला नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेची मात्र कोणतीही पर्वा नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
 
wadaki
 
वडकी येथील उड्डाणपुलासमोरील राळेगाव चौफुली लगतच्या सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढत असून, मोठा अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे वडकी येथील लहान बोगद्यात पावसाचे पाणी साचून संपूर्ण रस्त्यालाच तलावाचे स्वरूप आले आहे. हा मार्ग गावातील अत्यंत वर्दळीचा असून याच रस्त्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि कामगार दररोज ये-जा करतात.
 
 
 
मात्र प्रत्येकवेळी त्यांना साचलेल्या घाण पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. आज या बोगद्याखाली पाण्याचे अक्षरशः गटार तयार झाले असून नागरिकांना त्याच गटारातून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती प्रशासनासाठी लाजिरवाणी ठरत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा लहान बोगदा वरून अनेक ठिकाणी गळत असून, छतामधून सतत पाण्याचे थेंब पडत राहतात. त्यामुळे रस्त्यावर कायम पाणी साचून राहते. एवढेच नव्हे तर बोगद्याच्या छताला काही ठिकाणी भेगाही पडल्या असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात या भेगा अधिक वाढल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी ही बाब अनेक वेळा महामार्ग प्राधिकरण अधिकाèयांच्या निदर्शनास आणून दिली. प्रत्यक्ष पाहणीही झाली. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अधिकाèयांचे हे दुर्लक्ष आता निष्काळजीपणाच्या पलीकडे जाऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
 
 
 
विशेष म्हणजे, महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत वाहने याच मार्गाने दररोज ये-जा करतात. अधिकारी स्वतः या रस्त्याने प्रवास करत असतात. ते स्वतः या दुरवस्थेचे साक्षीदार असतानाही दुरुस्तीबाबत कोणतीही तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली मात्र जोरात सुरू आहे. वाहनांकडून नियमाने शुल्क घेतले जाते. परंतु त्याबदल्यात सुरक्षित आणि सुस्थितीत सेवा रस्ता देण्याची जबाबदारी मात्र महामार्ग प्राधिकरण पार पाडताना दिसत नाही. नागरिकांच्या पैशातून चालणारी व्यवस्था नागरिकांनाच वेठीस धरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आता तरी वरिष्ठ अधिकाèयांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, लहान बोगद्यातील साचलेल्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, गळती थांबवून भेगांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
जनतेचे थेट प्रश्न
टोल वेळेवर घेतला जातो, मग सुविधा वेळेवर का दिल्या जात नाहीत, सेवा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाला आणखी किती अपघातांची वाट पाहावी लागणार, गळक्या आणि भेगा पडलेल्या बोगद्याची तातडीने तांत्रिक तपासणी का केली जात नाही, शाळकरी विद्यार्थ्यांना रोज साचलेल्या पाण्यातून चालण्यास भाग पाडणाèया अधिकाèयांची जबाबदारी निश्चित होणार का, नागरिकांच्या जिवापेक्षा टोल वसुली अधिक महत्त्वाची आहे का, असे थेट प्रश्न आता जनता विचारू लागली आहे.