मुंबई
indian idol ‘इंडियन आयडल १२’मधून लोकप्रिय झालेला गायक मोहम्मद दानिश दुसऱ्यांदा पिता झाला आहे. त्याच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले असून, ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दानिशच्या या पोस्टनंतर चाहते आणि मनोरंजनविश्वातील अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मोहम्मद दानिशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नवजात मुलीला कुशीत घेतलेला दिसत असून, तिच्या कानात अजान देतानाचे क्षणही त्याने शेअर केले आहेत. मुस्लिम धर्मातील परंपरेनुसार बाळाच्या जन्मानंतर सर्वप्रथम त्याच्या कानात अजान दिली जाते. दानिशने ही धार्मिक परंपरा स्वतः पार पाडत आपल्या मुलीच्या कानात अजान दिली.या व्हिडिओसोबत त्याने भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. "अल्लाहची सर्वात सुंदर भेट आम्हाला मिळाली आहे. आमच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. अल्लाहने दिलेल्या या अमूल्य नेमतबद्दल अलहम्दुलिल्लाह," अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
दानिशने आपल्या लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली असली, तरी अद्याप तिचा चेहरा उघड केलेला नाही. मुलीच्या आगमनामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मोहम्मद दानिशने २०२३ मध्ये मोठ्या थाटामाटात विवाह केला होता. त्यानंतर २०२४ मध्ये त्याच्या घरी मुलाचा जन्म झाला होता. आता कन्यारत्नाच्या आगमनाने त्याचे कुटुंब पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
‘इंडियन आयडल १२’मधील स्पर्धक म्हणून मोहम्मद दानिशने देशभरात मोठी लोकप्रियता मिळवली. आपल्या सुरेल आणि भावपूर्ण गायकीमुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचे विजेतेपद त्याला मिळाले नसले, तरी आपल्या आवाजाच्या बळावर त्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.