वेध....
- अनिल उमाकांत फेकरीकर
Join the NCC पदवीचे ओझे खांद्यावर घेऊन फिरतोय, रोजगाराच्या शोधात स्वत:लाच विसरतोय. अशाच स्वरूपाचे निराशाजनक भयावह चित्र आपल्याला सभोवताल दिसते. याकरिता कुठल्याही सुक्ष्मदर्शक यंत्राची गरज भासत नाही. पण मग आपण ही समस्या सतत चघळत ठेवत युवकांची माथी खराब करायची की यातून मार्ग शोधून यश मिळवायचे, हा निर्णय सर्वस्वी आपल्याच हाती आहे. असाच विचार एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी केला. त्यांना अशा भयावह स्थितीतही एक राजमार्ग सापडला अन् त्यांनी तो अनुसरून एनसीसीचा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगारासाठी आवश्यक कौशल्य मिळविण्याची संधीच भारत सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेमार्फत उपलब्ध करून दिली आहे. एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी काही कंपन्यांशी बोलून राष्ट्रीय छात्र सेनेचा कोर्स पूर्ण करणाऱ्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यांना पीएमआयएस योजनेत संधी मिळावी याकरिता प्रयत्न केले. हा पुढाकार म्हणजे रोजगार निर्मितीचा फफार मोठा फॉर्म्यूला मानायला हवा. पहिल्यांदाच अशा स्वरूपात मुला-मुलींसाठी एनसीसीने विचार करावा, ही नक्कीच अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल.
तसे पाहता, ध्येय असावे उंच, नजर असावी तीक्ष्ण, परिश्रम असावेत प्रामाणिक, यश मिळेल निश्चित हा मंत्र ज्यांना उमगला त्यांना आयुष्यात यशोशिखर गाठण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही. पण याकरिता प्रत्येकाला स्वत:मध्ये बदल करावे लागतात. याकरिता एकता आणि शिस्त अनुसरावी लागते. जेव्हा ते गुण जो आत्मसात करतो तो नक्कीच रोजगार मिळवितो; नव्हे समजा हा फॉर्म्यूला सर्वांनी स्वीकारला तर नक्कीच देशातील बेरोजगारी चमत्कारिक पद्धतीने संपुष्टात येऊ शकते. अशा स्वरूपाची किमया प्रत्यक्षात व्हावी म्हणूनच एनसीसीने घेतलेला पुढाकार इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स होय. तिला राष्ट्रीय छात्र सेना किंवा राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल असेही संबोधले जाते. १५ जुलै १९४८ रोजी एनसीसी स्थापन झाली. ही भारतीय सशस्त्र दलाची एक युवा शाखा आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त, नेतृत्वगुण आणि सेवेची भावना निर्माण करणे हे एनसीसीचे मुख्य ध्येय आहे. आता त्यात रोजगार निर्मिती हेही ध्येय समाविष्ट झाले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल नेमके कसे कार्य करतात, याचा प्राथमिक अभ्यास यात मुला-मुलींना शिकविला जातो. एनसीसी आठव्या वर्गापासून सुरू होते तर पदवीपर्यंत त्यामार्फत विविध स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते. यापोटी संबंधितांना ए, बी आणि सी प्रमाणपत्र मिळते. त्याचा नंतरच्या लष्करी करीअरमध्ये फार मोठा लाभ मिळत असतो. या एनसीसीचा लाभ शहरापासून गावखेड्यातील मुलांनाही झाला पाहिजे म्हणून भारतातील ७०० जिल्ह्यांमध्ये तिचा कार्यविस्तार करण्यात आला आहे. दरवर्षी सुमारे २० लाख कॅडेट्स एनसीसीत सहभागी होतात. त्यातील सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त एनसीसी कॅडेट्स उत्तम दर्जाचे विविध स्वरूपातील प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सज्ज होतात. एवढा हा विस्तार कुठल्याही इतर संघटनेचा नाही. दरम्यान, भारत सरकारची पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू झाली आहे. त्यामार्फत सुमारे ५०० कंपन्यांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधीही एनसीसीने आपल्या विद्यार्थ्यांसाठी अक्षरश: खेचून आणली आहे. याद्वारे तरुणांना कौशल्य विकासासोबत दरमहा ९ हजार विद्यावेतन मिळणार आहे. म्हणजे सर्वोत्तम कौशल्य आत्मसात करा; सोबत दररोज होणारा खर्चही भारत सरकारच्या योजनेतून मिळवा, अशी दुहेरी लाभ देणारी योजना नक्कीच चमत्कारिक आहे. पण माझ्याजवळ काम नाही असे म्हणत बोटं मोडणाऱ्या युवक-युवतींनी ही योजना समजून घ्यायला हवी. इच्छा असेल तर मार्ग मिळतो. मग एनसीसीने आपल्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यांसाठी असा राजमार्ग मिळवून दिला तर नक्कीच त्याचा लाभ प्रत्येकाने मनापासून घ्यायलाच हवा. विशेष म्हणजे एनसीसीचे प्रमाणपत्र ज्यांना मिळते, त्यांच्याकरिता लष्करी सेवा, बीएसएफ, पोलिस दलात जाण्याचाही मार्ग मोकळा असतो. म्हणूनच आता विचार करा पक्का आणि एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण करून जीवनात चमत्कार घडवा..! असे सांगायची वेळ आलेली आहे. आज एनसीसीचे प्रशिक्षण ऐच्छिक आहे. पण जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी पाहता एनसीसी प्रशिक्षण कदाचित सरसकट सर्वांना लागू करावे लागेल. शेवटी, यश मिळविण्यासाठी कुठलीही लिफ्ट नसते. याकरिता कष्टाचा जिनाच चढावा लागतो, हे सदैव स्मरणात ठेवा.
९८८१७१७८५९