पुणे
siah goyal पुण्यातील वडगाव न्यायालयाने शुक्रवारी केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. तरीही, पोलिसांच्या म्हणण्यानुसार तपासात आवश्यक असा महत्त्वाचा पुरावा आता हाती लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कथितपणे हत्येचा कट रचताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ‘कोडवर्ड’चा वापर केला होता. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की दोघांच्या मोबाईलमधील मोठ्या प्रमाणात डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर करण्यात आला आहे. या संदेशांमधील सांकेतिक भाषा समजून घेण्यासाठी आता तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. दोघेही एकमेकांशी बोलताना टोपणनावांचा तसेच विविध इमोजींचा वापर करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे, ज्याचा नेमका अर्थ अद्याप स्पष्ट झालेला नाही.
दरम्यान, तपासाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले असून सियाचा दुसरा मोबाईल देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. हा मोबाईल तिच्या घरात करण्यात आलेल्या पंचनाम्यादरम्यान जप्त करण्यात आला. तो लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले असून तो पुढील तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला आहे. या मोबाईलमधून प्रकरणाशी संबंधित अनेक नवे आणि निर्णायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचदरम्यान, या प्रकरणात siah goyal पोलिसांनी बीडमधून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण बालेवाडी येथील एका कंपनीत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. तो सिया किंवा केतन यापैकी कोणाच्या तरी परिचयातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यक्तीला साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर सादर केले जाण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.