संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
monsoon session संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होत आहे. १३ ऑगस्टपर्यंत चालणारे यावेळचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. सरकारे केलेल्या शिफारसींच्या आधारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २० जुलैपासून संसदेचे अधिवेशन बोलवयाला मान्यता दिली. सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या निर्णयांची समाजमाध्यमातून माहिती दिली. पावसाळी अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वपूर्ण विधेयके सादर करण्याची शक्यता आहे.
 
 
monsoon session
 
आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर प्रथमच संसदेचे अधिवेशन होत आहे. त्यामुळे भाजपा गोटात उत्साहाचे वातावरण आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसचेही मनोबल वाढले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस पक्षात तसेच शिवसेना उबाठा सांसदीय पक्षात पडलेल्या फुटीमुळे यावेळी लोकसभेतील समीकरणे बदलली आहेत.
 
 
राज्यसभेतही आप सांसदीय पक्षात फूट पडली आहे. आपच्या सहा खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे लोकसभेत तसेच राज्यसभेतही रालोआ खासदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तामीळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर द्रमुक इंडिया आघाडीतून बाहेर पडला असून, त्याने सभागृहात आपल्या बसण्याची वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.