बासमती युद्धात पाकिस्तानचा पराभव

भारताची स्वस्त व आक्रमक निर्यात

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
तालिबानच्या शत्रुत्वाचाही फटका, दोन अब्ज डॉलर्सचे नुकसान
 
इस्लामाबाद,
pakistan defeated in the basmati war भारताच्या स्वस्त आणि आक्रमक तांदूळ निर्यातीमुळे पाकिस्तानचा तांदूळ उद्योग पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे. तसेच प्रादेशिक वादामुळे पाकिस्तानला ३.१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या (संसदेच्या) वाणिज्य समितीच्या बैठकीत वाणिज्य सचिव जवाद पॉल यांनी शुक्रवारी दिली
 
 
pakistan defeated in the basmati war
 
वाणिज्य सचिव पॉल पुढे म्हणाले, अफगाणिस्तान सीमा बंद झाल्यामुळे पाकिस्तानच्या निर्यातीत १.१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे़ तर मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्यातीत अंदाजे दोन अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. जावेद हनीफ खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीने पाकिस्तानच्या परदेशी व्यापारावर प्रादेशिक संघर्षांच्या परिणामाचा आढावा घेतला. यावेळी ते बाेलत हाेते़
 
अन्न क्षेत्रातील निर्यातीत २५ टक्के घट
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत पारगमन व्यापार आणि निर्यातीत १.२ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. तसेच अन्न क्षेत्रातील निर्यातीतही २५ टक्क्यांनी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारत स्वस्तात तांदूळ उपलब्ध करीत असून, वाढलेल्या या स्पर्धेमुळे तांदळाच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे़ पाकिस्तानी तांदूळ गुणवत्तेत सरस आहे़ परंतु, भारतीय तांदळाच्या कमी किमतीमुळे आपण बाजारातील आपला वाटा गमावत आहे़ भारतीय तांदूळ सुमारे १,१०० डॉलर्स प्रतिटन दराने विकला जात आहे, तर पाकिस्तानी तांदूळ सुमारे १,३०० डॉलर प्रतिटन दराने विकला जात आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे, असेही जवाद पॉल यांनी खासदारांना सांगितले़.
 
पाकिस्तानच्या घसरलेल्या विक्रीची प्रमुख कारणे
एकतर भारतीय तांदळाची किंमत पाकिस्तानी तांदळापेक्षा २०० डॉलर प्रतिटन कमी आहे. दुसरीकडे पाकिस्तानने स्वतः अफगाण सीमा बंद केली आहे़ त्यामुळे १.१ अब्ज डॉलर्सचे व्यापारी नुकसान झाले आहे. इराण युद्धामुळे मार्च महिन्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे़ त्यामुळेही पाकिस्तानी माल अडकून पडला आहे.
 
अपयशासाठी भारत जबाबदार
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दावा केला की, भारतीय व्यापारी पाकिस्तानी तांदूळ परदेशात विकण्यापूर्वी त्यावर वेगळा शिक्का मारत असल्याच्या तक्रारी त्यांना मिळाल्या होत्या़ परंतु, या दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा सापडला नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वतःच्या अपयशासाठी भारताला जबाबदार धरले आहे.