वेलिंग्टन,
prime minister christopher luxons भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि न्यूझीलंडच्या आर्थिक समृद्धीसाठी भारत महत्त्वाचा भागीदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० जुलैपासून न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या भेटीसाठी मी आतुर असल्याचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी म्हटले आहे.

मोदी यांच्या दौऱ्याची माहिती देताना लक्सन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, एप्रिलमध्ये स्वाक्षरी झालेल्या न्यूझीलंड-भारत मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून आम्ही दोन्ही देशांमधील संबंध एका नवीन स्तरावर नेत आहोत. यामुळे न्यूझीलंडमध्ये अधिक रोजगार निर्माण होतील, निर्यातीला चालना मिळेल आणि आर्थिक वाढ मजबूत होईल. यामुळे १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतीय बाजारपेठेत आपल्या वस्तू आणि सेवा निर्यात करण्याच्या नवीन संधी निर्माण होतील. पर्यायाने नवीन रोजगार निर्माण होतील आणि देशाच्या उत्पन्न वाढ होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ऐतिहासिक व्यापार करारानंतर जवळपास दोन महिन्यांनी मोदी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध लक्षणीयरीत्या मजबूत होणार आहे.
निर्यातीवरील १०० टक्के शुल्क रद्द
लक्सन यांनी सांगितले की, मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडला होणाऱ्या भारतीय निर्यातीसाठी बाजारपेठ उपलब्धता आणि शुल्क सवलती वाढतील. तसेच, हा करार विस्तृत ओशनिया आणि प्रशांत बेटांच्या बाजारपेठांसाठी एक प्रवेशद्वार म्हणूनही काम करेल. मुक्त व्यापार करारामुळे भारतीय निर्यातीवरील १०० टक्के शुल्क रद्द होणार आहे. न्यूझीलंड भारतात २० अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करेल, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक संबंध अधिक दृढ होतील.
कृषी क्षेत्रासाठी सहकार्य
भारतातील किवीफळ, सफरचंद आणि मध उत्पादकांची उत्पादकता, गुणवत्ता सुधारण्यासाठी न्यूझीलंडने किवीफळ, सफरचंद आणि मधासाठी केंद्रित कृती योजनांना सहमती दर्शवली आहे. कृषी उत्पादने आणि अल्ब्युमिनसाठी भारतात बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. कृषी क्षेत्रातील सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये फलोत्पादन, मध उत्पादन, वनीकरण, पशुधन, मत्स्यव्यवसाय, मधमाशी पालन आणि वाईन क्षेत्राचाही समावेश राहणार असल्याचे लक्सन म्हणाले