जयपूर,
rajasthan ats raids राजस्थान पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभरातील २० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. पाकिस्तानस्थित दहशतवादी शहजाद भट्टीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ३० जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाईल आणि समाज माध्यम खात्यांची तपासणी केली जात आहे.
एटीएसच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने जयपूर, अजमेर, चुरू, डुंगरपूर आणि बारमेरसह २० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती. एटीएसनुसार, पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टी समाज माध्यम मंचाचा वापर करून तरुणांना ऑनलाईन गेम्स, पैसे आणि गुंड व दहशतवाद्यांचे कथित ग्लॅमर देऊन आपल्या नेटवर्कमध्ये ओढत असे. संवेदनशील आणि मोक्याच्या ठिकाणांची छायाचित्रे आणि इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला असावा, असा तपास यंत्रणांना संशय आहे.
संशयितांच्या संबंधाचा करणार तपास
राजस्थान एटीएसचे पोलिस अधीक्षक मनीष त्रिपाठी यांनी सांगितले की, समाज माध्यमावर शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींविषयी तपास यंत्रणांना बऱ्याच काळापासून गुप्त माहिती मिळत होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. कारवाईपूर्वी राज्यभरातील अशा व्यक्तींची यादी तयार करण्यात आली होती, ज्यांची समाज माध्यम खाती शहजाद भट्टीशी जोडलेली आढळली होती़ संशयितांचे संबंध केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित होते की, ते इतर कारवायांमध्येही सामील होते, याचा तपास एटीएस करत आहे.