सतीशचा इंदूरकडे शाही प्रवास!

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
कानपुर,
satishs royal journey to indore उत्तर प्रदेशातील कानपूर प्राणीसंग्रहालय येथील प्राणी अदलाबदलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, प्राणीसंग्रहालयातील प्रसिद्ध पाणघोडा ‘सतीश’ लवकरच इंदूर प्राणीसंग्रहालय येथे रवाना होणार आहे. सतीशचा हा प्रवास अत्यंत विशेष ठरणार असून त्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. जवळपास ७०० किलोमीटरचा हा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
 
satishs royal journey to indore
 
सतीशला वाहतूक करण्यासाठी खास पिंजरा तयार करण्यात आला आहे. या पिंजऱ्यात त्याला बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे. प्रवासादरम्यान पाणघोड्याच्या शरीरातील ओलावा टिकून राहावा यासाठी ट्रकमध्ये विशेष पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सतत पाणी फवारण्यासाठी स्प्रे यंत्रणा बसवण्यात आली असून, अधूनमधून बादलीनेही त्याच्यावर पाणी टाकले जाणार आहे. संपूर्ण प्रवासात सतीशसाठी सुमारे २० हजार लिटर पाण्याचा वापर होणार असल्याचे सांगितले जात आहे. पाणघोडे बहुतेक वेळ पाण्यात घालवत असल्याने त्यांच्या त्वचेवर ओलावा टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते. जास्त वेळ पाण्यापासून दूर राहिल्यास त्वचेवर भेगा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवासादरम्यान दर १०० किलोमीटरनंतर थांबे घेऊन त्याची काळजी घेतली जाणार आहे. वाहनाचा वेगही नियंत्रित ठेवण्यात आला असून ट्रक ताशी ६० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावणार नाही.
 
या प्राणी अदलाबदलीच्या बदल्यात इंदूरहून तीन वर्षांची सिंहीण ‘वीरा’ कानपूरमध्ये दाखल होणार आहे. वीरा ही आशियाई प्रजातीची सिंहीण असून तिची जोडी कानपूरमधील नर सिंह ‘शंकर’सोबत लावली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत सिंह कुटुंबात नवीन सदस्य न आल्याने प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सिंहांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सध्या कानपूर प्राणीसंग्रहालयात पाच पाणघोडे आहेत. मात्र सतीश इंदूरला गेल्यानंतर येथे चार पाणघोडे उरणार आहेत. दुसरीकडे, नव्या सिंहीणीच्या आगमनामुळे कानपूर प्राणीसंग्रहालयातील सिंह कुटुंबात पुन्हा चैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.