ममता बॅनर्जींना धक्का; विश्वासू नेत्या चंद्रिमा भट्टाचार्यांचा राजीनामा

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
कोलकाता,
mamata banerjee पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून ममता बॅनर्जी यांना आणखी एक राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसमधील महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. चंद्रिमा भट्टाचार्य यांनी प्रदेशाध्यक्षपदासह पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांमधून पायउतार होत आपला राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे. विशेष म्हणजे, नुकतीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
mamata banerjee
 
चंद्रिमा भट्टाचार्य या पश्चिम बंगालच्या राजकारणातील प्रभावशाली नेत्या मानल्या जातात. राज्य सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना होत असल्याने हा निर्णय पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे. गेल्या काही काळापासून तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आणि गटबाजी उघडपणे समोर येत आहे. निवडणुकांतील निराशाजनक कामगिरीनंतर पक्षातील अनेक वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या निर्णयामुळे पक्षातील अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, तृणमूल काँग्रेससमोर सध्या संघटनात्मक स्थैर्य टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील वाढती नाराजी आणि सततचे राजकीय धक्के पाहता, आगामी काळात ममता बॅनर्जी या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.