मुंबई
tarak mehta ka ooltah chashmah छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने गेली 18 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या कालावधीत मालिकेतील अनेक कलाकारांनी निरोप घेतला असून त्यांच्या जागी नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. मात्र, काही व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेले स्थान आजही कायम आहे. त्यापैकी इन्स्पेक्टर चालू पांडे ही व्यक्तिरेखा विशेष लोकप्रिय ठरली आहे.
या भूमिकेला अभिनेते दयाशंकर पांडे यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख मिळवून दिली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना व्यापक लोकप्रियता मिळाली असली, तरी त्यांनी यापूर्वीच हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.
मालिकेत गोकुळधाम सोसायटीत जेव्हा जेव्हा एखादा गोंधळ किंवा गुन्ह्याचे प्रकरण घडते, तेव्हा मदतीसाठी इन्स्पेक्टर चालू पांडे यांनाच पाचारण केले जाते. स्वतःला अत्यंत हुशार समजणारा हा पोलीस अधिकारी आपल्या पत्नीसमोर मात्र पूर्णपणे नरम पडतो. त्यांच्या या विनोदी स्वभाववैशिष्ट्यामुळे प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा विशेष भावते. तसेच जेठालाल आणि चालू पांडे यांच्यातील संवाद आणि पडद्यावरील केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
दयाशंकर पांडे हे केवळ या मालिकेत कलाकार म्हणूनच कार्यरत नाहीत, तर ते क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. 2010 पासून ते या मालिकेशी जोडले गेले असून गेली 16 वर्षे ते या मालिकेचा अविभाज्य भाग आहेत.
दूरचित्रवाणीसोबतच दयाशंकर पांडे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आमिर खान यांच्या ‘लगान’ या चित्रपटात त्यांनी ‘गोळी’ ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात ते वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत झळकले होते.
त्यानंतर अजय देवगण यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. या चित्रपटातील त्यांचा “भारी मिस्टेक हो गया सर” हा संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असून तो विशेष लोकप्रिय ठरला आहे. सोशल मीडियावर या संवादावर आधारित अनेक मीम्सदेखील आजही पाहायला मिळतात.
याशिवाय दयाशंकर पांडे यांनी ‘राजनीती’, ‘लक’, ‘चक्रव्यूह’, ‘हसीना पारकर’, ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘मैं अटल हूं’ यांसारख्या चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाच्या वैविध्यपूर्ण शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांवर स्वतःची वेगळी छाप उमटवली असून छोट्या पडद्यापासून ते रुपेरी पडद्यापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय मानला जातो.