वॉशिंग्टन,
trump takes at Khamenei's funeral इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यविधीला सुरुवात होत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा रंगली आहे. अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दक्षिण डकोटा येथील माउंट रशमोर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी अलीकडील अमेरिका-इराण संघर्षावर भाष्य केले. यावेळी त्यांनी इराणवर कठोर शब्दांत टीका करत, अमेरिकेने इराणला मोठा धक्का दिल्याचा दावा केला. तसेच आता इराण करारासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले. अंत्यविधीचा उल्लेख करताना त्यांनी “आम्ही चांगले आहोत, म्हणून इराणला एक आठवड्याची सुट्टी दिली, अशी टिप्पणी केली.

दरम्यान, इराणमध्ये अली खामेनेई यांच्या अंत्यविधीसाठी आठवडाभर चालणाऱ्या शासकीय कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. इराणी प्रशासनाच्या माहितीनुसार, श्रद्धांजली सभांसह अंत्यसंस्कार कार्यक्रमांना लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशभरातून मोठ्या संख्येने लोक अंतिम दर्शनासाठी दाखल होत आहेत. इराणच्या दाव्यानुसार, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यात अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनाही जीव गमवावा लागला. त्यामध्ये त्यांची मुलगी, जावई, नातू आणि सून यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. इस्लामिक परंपरेनुसार मृत व्यक्तीचे २४ तासांच्या आत दफन करण्याची प्रथा आहे. मात्र, युद्धजन्य परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव खामेनी यांच्या अंत्यसंस्कारात विलंब झाला. गेल्या महिन्यात युद्धविराम लागू झाल्यानंतर इराणी प्रशासनाने अखेर अंत्यविधीचे नियोजन करून अधिकृत कार्यक्रम जाहीर केले.