८० सायकलपटू पंढरपूर वारीला रवाना

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
pandharpur-wari : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, स्वच्छता आणि ‘नशामुक्त भारत’चा संदेश देत नागपुरातील ८० सायकलपटू रविवारी सकाळी ६ वाजता रेडिसन ब्ल्यू हॉटेल येथून पंढरपूर सायकल वारीसाठी उत्साहात रवाना झाले. या सायकल वारीचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून, सायकलपटू सुमारे ७०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार असून दररोज सुमारे १३० किलोमीटर सायकल चालवत ते पंढरपूर गाठणार आहेत.
 
 
 
vari
 
 
वारीपूर्वी ४ जुलै रोजी आयोजित रिंगण सोहळ्यात विघ्नहर्ता योग ग्रुप, पॉवर योगा ग्रुप, गुरुदेव भजन मंडळ, वारकरी दिंडी पथक आणि महिला योग मंडळ यांच्या सहभागातून सुमारे ३०० जणांनी पारंपरिक रिंगण सादर करून वारीचे भक्तिमय वातावरण निर्माण केले.
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसन्न हरदास होते. आयर्नमॅन राजेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते केशरी झेंडा दाखवून वारीला प्रारंभ करण्यात आला. या वारीत दिव्यांग सायकलपटू दिलीप भोयर यांचा प्रेरणादायी सहभाग विशेष आकर्षण ठरला. तसेच ८५ वर्षीय सुरेश उमाटे हे सर्वात ज्येष्ठ सायकलपटू म्हणून सहभागी झाले आहेत. आई-मुलीची जोडी मोनिका चतुर्वेदी आणि सुजाता चतुर्वेदी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. महिला सायकलपटूंमध्ये डॉ. कीर्ती बिहारे, कविता मुंडले यांच्यासह एकूण चार महिलांनी सहभाग नोंदविला. या वारीत क्रीडा भारती, टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर, टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन, सुष्टी परिवार, उदगीर सायकल्स क्लब, आर्णी सायकलिंग क्लब आणि वर्धा सायकलिंग क्लब यांसह विदर्भातील विविध सायकलिंग संस्थांचे सदस्य सहभागी झाले आहेत. पर्यावरण रक्षण, सायकल चालवा, पेट्रोल वाचवा, वृक्षारोपण व संवर्धन, स्वच्छतेचा प्रसार आणि नशामुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा या सायकल वारीचा प्रमुख उद्देशआहे.