बीएमडब्ल्यूच्या एका तपासणीने उघड केला लाखोंचा खेळ!

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
लखनौ,
bmw inspection reveals a racket उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आलिशान बीएमडब्ल्यू कारमधून तब्बल २६ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मृती उपवन परिसरात ही कारवाई करण्यात आली. कारच्या डिकीत असलेल्या लॉकरमधून ५०० रुपयांच्या नोटांचे ५२ बंडल आढळून आले. मात्र, या रकमेबाबत संबंधितांकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याने पोलिसांनी तत्काळ रोकड जप्त केली.
 
bmw
 
या कारवाईदरम्यान बीएमडब्ल्यूसह एक स्कॉर्पिओ वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात तीन तरुणांची चौकशी सुरू असून, रोकड नेमकी कुठून आली आणि ती कुठे नेली जात होती, याचा शोध पोलीस आणि आयकर विभाग घेत आहेत. जप्त करण्यात आलेली संपूर्ण रोकड पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
 
तपासादरम्यान काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. बीएमडब्ल्यू कारची नंबर प्लेट संशयास्पद असल्याचे आढळले, तर स्कॉर्पिओ वाहनाला काळी फिल्म लावण्यात आली होती. या वाहनावर उत्तर प्रदेश विधानसभेतील एका आमदाराचे स्टिकर लावलेले होते. याशिवाय वाहनाला नियमित नंबर प्लेट नसून साईड मिररवर 'माफिया' असा शब्द लिहिलेला असल्यामुळे या वाहनांची अधिक चर्चा सुरू झाली आहे. चौकशीदरम्यान संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी ते अद्याप शिक्षण घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांच्या ताब्यातील २६ लाख रुपयांच्या रोख रकमेचा कोणताही समाधानकारक हिशोब सादर करता आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू आहे.
 
दरम्यान, यापूर्वी मे २०२६ मध्ये गुजरातमधील दाहोद येथेही वाहन तपासणीदरम्यान एका कारमधून २.५६ कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती. ही रक्कम दाहोदमधील एका कंपनीकडून वडोदरा येथे नेली जात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रे नसल्याने ती रक्कम जप्त करून आयकर विभागाकडे तपासासाठी सोपवण्यात आली होती. लखनौमधील ताज्या कारवाईमुळे बेकायदेशीर रोख व्यवहारांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणात पुढे आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.