खीर, गोळ्या आणि...

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
आग्रा,
agra murder case उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातील सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका धाम कॉलनीमध्ये उघडकीस आलेल्या सुरेंद्र कुमार शर्मा हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे. ४४ वर्षीय सुरेंद्र शर्मा हे १८ मेपासून बेपत्ता होते. २६ मे रोजी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. मात्र सुमारे ४५ दिवसांनी पोलिसांनी घरातील बाथरूमची फरशी उखडली असता त्याखाली सुरेंद्र यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पत्नी रुबीला अटक करण्यात आली असून, चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
 
agra murder case
 
या तपासादरम्यान बाथरूममध्ये नवीन फरशी बसवणाऱ्या गवंडी रवी कुमारचा जबाबही समोर आला आहे. रवी कुमारने सांगितले की, त्याची रुबीशी यापूर्वी कोणतीही ओळख नव्हती. परिसरातील दुसऱ्या एका घरात काम केल्यामुळे रुबीने त्याचा संपर्क मिळवून बाथरूम दुरुस्तीचे काम दिले होते. रुबीने दुपारी सुमारे दीड वाजता फोन करून बोलावले होते. त्या दिवशी काम शक्य नसल्याने रवीने दुसऱ्या दिवशी येण्याचे सांगितले.
 
रवी कुमारच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी तो घरी पोहोचला तेव्हा रुबी आणि आणखी एक महिला बाथरूममध्ये स्वतःच मलबा आणि कचरा भरत होत्या. हे पाहून त्याने मजूर ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र रुबीने "मी स्वतःच करीन," असे सांगत त्याचा सल्ला नाकारला. त्यानंतर तिने त्याला ५०० रुपये देऊन बांधकामासाठी लागणारे साहित्य मागवण्यास सांगितले.
 
रवीने पोलिसांना सांगितले की, बाथरूमचा आकार सुमारे ४ बाय ६ फूट होता. टॉयलेट सीट आधीपासूनच सुमारे दीड फूट उंच होती. त्याच्यासोबत आलेल्या एका मजुराने सिमेंट आणि मोर्टार तयार केले, त्यानंतर संपूर्ण बाथरूममध्ये नवीन फरशी बसवण्यात आली. ज्या ठिकाणी तो काम करत होता, त्या फरशीखाली एका व्यक्तीचा मृतदेह पुरलेला आहे, याची त्याला कोणतीही कल्पना नव्हती, असेही त्याने स्पष्ट केले.
 
पोलिसांच्या तपासानुसार, रुबीने कथितपणे सुरेंद्र शर्मा यांना खीरमध्ये १५ ते १६ झोपेच्या गोळ्या मिसळून खाऊ घातल्या. त्यानंतर त्यांची हत्या करून दुसऱ्या दिवशी मुली आणि सासूला दीराच्या घरी पाठवले. घरात एकटी असताना तिने मृतदेह बाथरूममध्ये ओढून नेला, खड्डा खोदून पुरला आणि त्यावर माती टाकून जागा सपाट केली. त्यानंतर गवंड्याला बोलावून बाथरूममध्ये नवीन सिमेंटची फरशी बसवून घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
 
दरम्यान, सुरेंद्र शर्मा यांचा बराच काळ शोध लागला नसल्याने त्यांचे मोठे भाऊ अनिल शर्मा यांना संशय आला. सुरेंद्र बेपत्ता झाल्यानंतर रुबी सतत वेगवेगळी कारणे सांगत असल्यामुळे त्यांनी स्वतः चौकशी सुरू केली. बँकेची कागदपत्रे आणि इतर माहिती तपासल्यानंतर त्यांनी पुन्हा रुबीशी चर्चा केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी रुबी भावूक झाली आणि तिने मृतदेह बाथरूमच्या फरशीखाली पुरल्याची माहिती दिली.
 
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाथरूमची फरशी उखडली आणि सुरेंद्र शर्मा यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी आरोपी रुबीला अटक करून न्यायालयीन कोठडी मिळवली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून न्यायवैद्यक तपास सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, हत्येमागील नेमके कारण काय होते आणि संपूर्ण कट पूर्वनियोजित होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.