वॉशिंग्टनमध्ये इतिहासातील सर्वात भव्य फटाक्यांची आतषबाजी

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० वर्षांचा जल्लोष

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन
america 250 अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये इतिहासातील सर्वात मोठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर न्यूयॉर्कमध्ये एअर शो, मियामीमध्ये कॉन्सर्ट, फिलाडेल्फियासह विविध शहरांमध्ये परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभरातील स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
 

america celebrates 250 years of independence with spectacular fireworks, air shows and nationwide celebrations 
वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या फटाक्यांच्या आतषबाजीत तब्बल ८ लाख ५० हजार फटाक्यांचे गोळे आकाशात झेपावले. न्यूयॉर्कमध्ये ‘सेल २५०’ कार्यक्रमाअंतर्गत हडसन नदीवर ऐतिहासिक आणि लष्करी जहाजांची भव्य परेड काढण्यात आली. वॉशिंग्टन डीसीतील मुख्य समारंभादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष विमान ‘एअर फोर्स वन’ (VC-25A) यांनी फ्लायपास्ट केला. फिलाडेल्फियातील इंडिपेन्डन्स मॉल येथे नागरिकांनी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला. टेक्सासमधील आर्लिंग्टन येथील ग्लोब लाइफ फील्डमध्ये खेळल्या गेलेल्या बेसबॉल सामन्यादरम्यान ‘अमेरिका २५०’चा लोगो प्रदर्शित करण्यात आला, तसेच डीजे आणि नृत्यकलावंतांनी सादरीकरण करून वातावरण रंगतदार केले.
 
स्वातंत्र्याच्या २५०व्या वर्षानिमित्त न्यूयॉर्कमध्ये मेसीजची पारंपरिक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीने संपूर्ण आकाश रोषणाईने उजळून निघाले असून, देशभरातील उत्सवाचे ते प्रमुख आकर्षण ठरले. वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉल येथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मियामीमध्ये शनिवारी रात्री रंगीबेरंगी फटाक्यांच्या रोषणाईने आकाश उजळून निघाले, तर ब्रुकलिनमध्येही आकर्षक आतषबाजीसोबत शहर रोषणाईने सजविण्यात आले. न्यू जर्सीमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीजवळही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
 
फ्लोरिडामधील मियामी america 250 येथे आयोजित ‘फीफा फॅन फेस्ट’मध्ये नागरिकांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५०व्या वर्धापनदिनाचा उत्साहात आनंद साजरा केला. या कार्यक्रमात गायक विली चिरिनो यांनी सादरीकरण केले, तर प्रेक्षकांसाठी विशेष ड्रोन शोचेही आयोजन करण्यात आले. केंटकी राज्यातील लुईव्हिल येथे ‘डॉन्स अर्ली लाइट’ कार्यक्रमादरम्यान स्थानिक आदिवासी परंपरेनुसार स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. टेक्सासमधील ह्यूस्टन स्टेडियममध्ये कॅनडा आणि मोरोक्को यांच्यातील फीफा विश्वचषक सामन्यापूर्वी एका फुटबॉल चाहत्याने स्टँडमध्ये ‘अमेरिका २५०’चा ध्वज हातात घेत उत्सवात सहभाग नोंदविला.न्यूयॉर्कमध्ये ‘सेल २५०’ कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेल्या परेडवेळी आकाशात लढाऊ विमानांनी फ्लायपास्ट करून उपस्थितांचे लक्ष वेधले. हडसन नदीवरील नौदल परेडमध्ये यूएसएस किर्सार्ज आणि आरएमएस क्वीन मेरीसह अनेक जहाजांचा सहभाग होता. वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या वरून लढाऊ विमानांनी फ्लायपास्ट केला. कॅपिटल हिल कम्युनिटी परेडमध्ये मिनेसोटा येथील ‘केरखोवन-मर्डॉक-सनबर्ग मार्चिंग सेंट्स’ बँडने सहभाग घेतला. वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या लढाऊ विमानांच्या एअर परेडचे दृश्य नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यांत टिपत या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले.