अमरावतीत हत्यांचे सत्र सुरूच
अमरावती,
Amravati murder case शहरातील विद्याभारती कॉलेजजवळ एका युवकाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २ तासांत ३ मारेकऱ्यांना अटक केली. शहरात सातत्याने हत्येच्या घटना घडत आहे. पाेलिसांना शनिवारी रात्री ११.३० वाजता माहिती मिळाली की, विद्याभारती कॉलेजजवळ एका युवकाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता जायेद हुसैन खान (२८) रा. पाकिजा कॉलनी याची हत्या झाल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल वर, पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना मृत व आरोपींमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
शेख इम्रान शेख महमूद ऊर्फ गोलू कुरेशी (३०) रा. कलाम चौक, शेख समीर शेख जुम्मन (३२) रा. चिलम छावणी, शेख अमीन शेख जब्बार (३४) रा. राहुलनगर या ३ मारेकऱ्यांची ओळख पटली. ते चारचाकी वाहनाने पळाल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचा पोलिसांनी १ तास थराराकपणे पाठलाग केला. शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करतानाच त्यांना बडनेरा वाय पॉईंट येथून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपींचे मृताशी काही कारणावरून भांडण झाले आणि या भांडणातूनच हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. शेख इम्रान शेख महमूद ऊर्फ गोलू कुरेशी याच्यावर यापूर्वी यवतमाळ शहरात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो बरीच वर्षे मध्यवर्ती कारागृहात होता. नुकताच बाहेर आला होता.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले, सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे, सहायक पोलिस निरीक्षक दशरथ आडे, पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनुने, अंमलदार सुनील लासूरकर, फिरोज खान, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, मंगेश लोखंडे, मंगेश परिमल, आस्तिक देशमुख, संभाजी केंद्रे, जहीर शेख, सचिन बहाळे, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सय्यद, अतुल संभे, संजय भारसाकळे, विकास गुडधे, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, रणजित गावंडे, राजीक रायलीवाले, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार, चेतन गुल्हाने, चालक चेतन शर्मा, राहुल दुधे, संदीप खंडारे, प्रभात पोकळे यांनी केली.