अग्रवाल कुटुंबावर दुःखाचे डोंगर... केतनच्या आजोबांचे निधन

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
पुणे,
ketan murder case केतन अग्रवाल हत्याप्रकरणात तपास सुरू असतानाच अग्रवाल कुटुंबावर आणखी एक मोठे दुःख कोसळले आहे. केतनचे ७१ वर्षीय आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नातवाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
 
ketan murder case
  
देवीचंद अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी केतनला न्याय मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेणबत्ती आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी या घटनेला विश्वासघाताची परिसीमा असल्याचे म्हटले होते. मुलीच्या कुटुंबाला सर्व माहिती असूनही त्यांनी हे लग्न थांबवले नाही, असा आरोप करत आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
 
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. तपासादरम्यान सिया गोयलने तिच्या एका मैत्रिणीला पाठवलेला स्नॅपचॅट संदेश समोर आला आहे. या संदेशात तिने, "हे लग्न होणार नाही," असे स्पष्टपणे लिहिले असल्याचे समोर आले आहे. तसेच उदयपूर येथे होणाऱ्या प्रस्तावित विवाहासाठी विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी मैत्रिणीच्या आधार कार्डची प्रत मागितल्याचेही तपासात आढळले आहे. "तुझे आधार कार्ड पाठव, मी अशा लग्नासाठी तिकीट काढते जे कधीच होणार नाही," असा संदेश तिने पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
 
या चॅटच्या आधारे पोलिसांकडून नव्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. लग्नाची तयारी सुरू असल्याचा आभास निर्माण करून हत्येचा कट लपवण्याचा हा प्रयत्न होता का, याचा तपास केला जात आहे. तसेच सियाच्या मैत्रिणीला या कटाची पूर्वकल्पना होती का, हे जाणून घेण्यासाठी तिचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
दुसरीकडे, सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी मुलगी आणि चेतन चौधरी यांच्या नात्याची आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असे सांगितले आहे. ही बाब आधीच समजली असती, तर लग्नाचा निर्णय बदलला असता, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सियाच्या कथित असभ्य हावभावांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण देत, पोलिसांच्या वाहनात बसवताना गाडीच्या दारामुळे तिच्या हाताला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तिच्या हाताची हालचाल चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली, असे सांगितले.
 
केतनचे वडीलही या घटनेवर संताप व्यक्त करत म्हणाले की, जर सियाला हे लग्न करायचे नव्हते, तर तिने स्पष्टपणे नकार दिला असता. आम्ही लग्न रद्द केले असते. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या २६ वर्षीय मुलाचा जीव घेण्यात आला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात २० वर्षीय सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर २२ वर्षीय चेतन चौधरी यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. १५ जून रोजी पुण्यातील लोहगाव किल्ला परिसरात केतन अग्रवाल यांना खड्ड्यात ढकलून हत्या केल्याचा आरोप दोघांवर असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.