आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
पुणे,
ashadhi wari 2026 आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना तातडीच्या व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदा प्रथमच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध केली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली.
पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि पंढरपूर येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर तसेच पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आल्याचे आबिटकर यांनी सांगितले. यंदा ‘आरोग्यसंपन्न वारी’ आणि ‘वारी सहाय्य’ या उपक्रमांतर्गत डिजिटल आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, उपचार सुविधा, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांची माहिती वारकऱ्यांना तत्काळ मिळणार आहे.
वारीतील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच पंढरपूर आणि परिसरातील खासगी डॉक्टरांनीही सेवाभावी वृत्तीने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
४३ ठिकाणी आयसीयु सुविधा
आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले की, पालखी मार्गावर ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयू सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत १५६ ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वारी मार्गावर एकूण ३५३ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून त्यामध्ये ३८ एएलएस, ७३ बीएलएस आणि ‘१०२’ क्रमांकाच्या २४२ रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागात १६ आयसीयू कक्ष, १७ तात्पुरते दवाखाने आणि विठ्ठल मंदिर परिसरात २४ तास कार्यरत आयसीयू सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय पंढरपूर व माळशिरस परिसरात अतिरिक्त पाच आयसीयू कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्स सुविधा
१५६ प्राथमिक उपचार केंद्रे कार्यरत
३५३ रुग्णवाहिका तैनात
३,०८७ आरोग्य कर्मचारी व ३०२ तज्ज्ञ डॉक्टर सेवेत
‘आरोग्यसंपन्न वारी’ मोबाईल ॲपद्वारे डिजिटल आरोग्य सेवा
खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा राखीव
पंढरपुरात २४ तास आयसीयू व महाआरोग्य सुविधा उपलब्ध