रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
- गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळील घटना, वन्यजीव सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गोंदिया,
bear Death  रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गंगाझरी ऱेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेने पुन्हा एकदा वन्यजीवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. गंगाझरी परिसर हा दाट जंगलांनी वेढलेला असून, येथे अस्वल, बिबट, हरिण, रानडुक्कर तसेच इतर वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अन्न, पाणी किंवा अधिवासाच्या शोधात हे प्राणी अनेकदा रेल्वे रुळ ओलांडतात. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटना अधूनमधून घडत असून, यावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वारंवार होत आहे. रविवारी घडलेल्या घटनेत रेल्वे रुळ ओलांडत असताना अस्वलाला भरधाव रेल्वेची धडक बसली.
 
 
bear
 
धडक इतकी भीषण होती की अस्वलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली. वन्यजीवप्रेमींच्या मते, या भागात वन्यप्राण्यांची नियमित हालचाल होत असतानाही त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येते. रेल्वे मार्गालगत संवेदनशील ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हालचालींचे निरीक्षण, सतर्कता यंत्रणा, कुंपण, तसेच रेल्वे प्रशासन व वन विभाग यांच्यात अधिक समन्वयाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय, परिसरात वन विभागाच्या देखरेखीअभावी अवैध वृक्षतोड, शिकारीचे प्रयत्न आणि जंगलातील इतर अनधिकृत हालचाली वाढत असल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे. अशा प्रकारांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास वनसंपदा आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अस्वलाच्या मृत्यूच्या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. संबंधित विभागांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक आणि वन्यजीवप्रेमी व्यक्त करत आहेत.