डोंगरावरून दगड कोसळून बसचा अपघात; एक ठार

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
चंबा,
bus accident caused by falling rocks हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक गंभीर अपघात घडला. भरमौरहून चंबाकडे जाणाऱ्या हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एचआरटीसी)च्या HP-30A-0352 क्रमांकाच्या बसवर गायहरा परिसरात डोंगरावरून अचानक एक मोठा दगड कोसळला. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत बसचे छत फाटून दगड थेट बसच्या आत घुसल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते.
 
bus accident caused by falling rocks
 
या भीषण दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बसमधील बहुतांश प्रवासी शिवपूजन सोहळा आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना बसमधून बाहेर काढले.
 
जखमींना पुढील उपचारांसाठी चंबा येथील पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. डोंगराळ भागात वारंवार होणारे भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
दरम्यान, हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. कांग्रा जिल्ह्यातील न्यूगल दरी परिसरात एका ओढ्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पंजाबमधील दोन मुलांसह सात पर्यटक अडकले होते. पर्यटक एका खाजगी कॉफी हाऊसजवळील दरीच्या काठाने फिरण्यासाठी गेले असताना परतीच्या वेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे तात्पुरत्या लाकडी पुलाचे नुकसान झाले आणि ते नदीच्या पलीकडे अडकून पडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने तात्पुरता मार्ग तयार केला. बचाव पथकाने सर्वप्रथम दोन मुलांना, त्यानंतर महिलांना आणि शेवटी पुरुषांना सुरक्षित बाहेर काढत सातही पर्यटकांची सुखरूप सुटका केली.