नाशिक
cbi case देवळाली छावनी बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि २०१२ बॅचमधील अधिकारी अजय कुमार यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात अवघी ५२ हजार रुपयांची संपत्ती घोषित करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या मालमत्तेत काही वर्षांतच कोट्यवधींची वाढ झाल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर सीबीआयचे लक्ष त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मालमत्तेतील असामान्य वाढीवर केंद्रित झाले असून, त्यानंतर सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने त्यांच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचाही अभ्यास केला असून, पत्नी आणि आई यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सीबीआयच्या तपासात १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या कालावधीतील त्यांच्या मालमत्तेची छाननी करण्यात आली. सुरुवातीला त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५२,४२८ रुपये असल्याचे नोंदवले गेले होते. मात्र दहा वर्षांच्या कालावधीत ही मालमत्ता वाढून सुमारे ५ कोटी ५९ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. याच काळात त्यांनी सुमारे ५ कोटी १७ लाख रुपये खर्च केल्याची माहितीही मिळाली आहे.
सीबीआयच्या मते, cbi case त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत इतकी मोठी मालमत्ता निर्माण होण्याचा कोणताही स्पष्ट आणि समाधानकारक स्रोत आढळलेला नाही. कायदेशीर उत्पन्नाच्या आधारावर साधारणतः केवळ १३ लाख ६४ हजार रुपयांची बचत अपेक्षित असताना, त्यांच्या नावावर सुमारे ५ कोटी ७२ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. या संपत्तीबाबत समाधानकारक कागदपत्रे किंवा स्पष्टीकरण देण्यात ते अपयशी ठरल्याचे सीबीआयने नमूद केले आहे. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या तपासात अजय कुमार यांची पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांचीही भूमिका तपासण्यात आली आहे. त्यांना मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास मदत केल्याचा तसेच कथित काळा पैसा लपवण्यात आणि त्याचा वापर करण्यास सहाय्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच अंतिम निष्कर्ष समोर येणार असल्याचे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.