धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला ३ महिन्याचा कारावास

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
वाशीम,
cheque bounce case washim वैयक्तीक कामासाठी घेतलेल्या २ लाख रुपये हात उसण्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश बँकेत पुरेशा रकमेअभावी अनादरित झाल्याप्रकरणी वाशीम येथील न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून ३ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावणी केली आहे, तसेच फिर्यादीला दोन महिन्याच्या आत ३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम न दिल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.
 

cheque bounce case washim 
फिर्यादी श्यामराव तुळशीराम ढोबळे (वय ४८) रा. बाभुळगाव, ह.मु. वाशीम आणि सुधाकर सुरुशे (वय ४५ ) रा. लाखाळा, वाशीम यांच्यात कौटुंबिक व स्नेहाचे संबंध होते. याच परिचयातून आरोपी सुधाकर सुरुशे याने घराच्या कामासाठी एप्रिल २०२२ मध्ये फिर्यादीकडे २ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार श्यामराव ढोबळे यांनी २५ एप्रिल २०२२ रोजी आरोपीला २ लाख रुपये नगदी आणि बिनव्याजी हातउसणे म्हणून दिले होते. ही रक्कम दोन महिन्यात परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न केल्याने फिर्यादीने तगादा लावला. त्यावर आरोपी सुरुशे याने पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड (शाखा वाशीम) चा २ लाख रुपयांचा धनादेश फिर्यादीच्या नावे लिहून दिला. हा धनादेश २ जुलै २०२२ रोजी बँकेत वटवण्यासाठी टाकला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो अनादरित होऊन परत आला. यानंतर फिर्यादीने आपले वकील अ‍ॅड. अमोल सोमाणी यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवूनही आरोपीने पैसे न दिल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली.
न्यायाधीश एस. बी. ढेंबरे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे पडताळून पाहिल्यानंतर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्र. २ चे न्यायाधीश एस. बी. ढेंबरे यांनी ३ जुलै २०२६ रोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर केला. न्यायालयाने आरोपी सुधाकर सुरुशे याला ’निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅट’च्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली.यामध्ये आरोपीला तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिर्यादीला दोन महिन्याच्या आत ३ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जर आरोपीने ही नुकसान भरपाईची रक्कम विहित मुदतीत दिली नाही, तर त्याला आणखी ३ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.