एक महिन्यांतच पुलाला तडे, जोडरस्त्यात पडली खच

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
देवळी,
deoli bridge cracks प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देवळी-डिगडोह-नागझरी मार्गावरील यशोदा नदीवर कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाच्या कामावर विपूल ताडाम व जय जगताप यांनी गंभीर आक्षेप घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून तक्रार केली आहे. अवघ्या एक महिन्यांपूर्वी काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्याला तब्बल ६ ते ८ इंचांपर्यंत खच पडल्याने पूल व रस्ता यांच्या जोडणीच्या ठिकाणी फट निर्माण झाली आहे. तसेच या पुलाला जोडणार्या डांबरी रस्त्याचे डांबर हातानेच उखडत असून पुलाच्या पिल्लरमध्ये सुद्धा गॅप पडल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निकृष्ठ पुलाच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 

deoli bridge cracks 
देवळी-डिगडोह-नागझरी मार्गावरील यशोदा नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलासाठी सुमारे २ कोटी ५४ लाख ५३ हजार रुपये खर्चून कामाचे कंत्राट मे. एस. आर. के. इन्फ्रा, पुणे या कंपनीला देण्यात आले. या पुलाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, पूल रहदारीकरिता सुरू झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यातच पुलावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच जोडरस्ता खचल्यामुळे पुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना बसविण्यात आलेले सुरक्षा व रिफ्लेक्टर पोलही निकृष्ट पद्धतीने उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक सुरक्षा पोल वाकले असून काही पडण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांच्या deoli bridge cracks  म्हणण्यानुसार, या पुलाचे कंत्राट पुण्यातील कंपनीला देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम वर्धेतील एका स्थानिक कंत्राटदारामार्फत करण्यात आले. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मोठा निधी खर्च करून उभारलेल्या पुलाची अशी अवस्था झाल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, कंत्राटदाराचे उर्वरित देयक थांबवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी केली आहे.