धंतोलीत एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरित्या बेपत्ता

नागपुरात खळबळ

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
dhantoli missing family case धंतोलीतील एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये १२ वर्षीय मुलगा, २१ वर्षीय युवती तसेच तीन प्रौढांचा समावेश असून पोलिसांकडून सर्वांचा कसून शोध सुरू आहे.
 

dhantoli missing family case 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील बलराज मार्गावरील प्लॉट क्रमांक ४० येथील 'दुर्गा सदन' या घरात श्यामसुंदर कीमतराय परसवानी (७१) यांचे संयुक्त कुटुंब राहते. याच घरात त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश कीमतराय परसवानी यांचे कुटुंबही वास्तव्यास होते. २४ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजल्यापासून सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील पाचही सदस्य कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर परतलेच नाहीत. नातेवाईकांकडे तसेच इतर संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा कोणताही मागमूस न लागल्याने २९ जून रोजी श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. बेपत्ता झालेल्यांमध्ये हर्षा सुरेश परसवानी (५७), जितेंद्र सुरेश परसवानी (४२), ईशिता जितेंद्र परसवानी (४०), खुशी जितेंद्र परसवानी (२१) आणि किशन (१२) यांचा समावेश आहे. धंतोली पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. बेपत्ता व्यक्तींच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळल्याने त्या दिशेनेही पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.