वनाधिकाऱ्यांची गाडी व घर जाळण्याचा प्रयत्न

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
पूर्वनियोजित कटाचा संशय
 
धारणी, 
Dharni, Forest Incident धारणीमध्ये वनाधिकाऱ्यांची गाडी व घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे शासकीय वसाहतीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वनाधिकाऱ्यांनी तत्काळ शेजारील नागरिकांना बोलावल्यावर सर्वांनी मिळून आग विझविली. यामुळे गाडी पूर्णपणे जळण्यापासून वाचली आणि आग शासकीय निवासस्थानापर्यंत पसरण्यापासून रोखली गेली. स्थानिकांच्या मते, काही मिनिटांचा उशीर झाला असता तर नुकसान जास्त झाले असते.
 
 
dharani
 
आरोपीने केवळ वाहनालाच लक्ष्य केले नाही, तर शासकीय निवासस्थानाची खिडकी फोडून आत ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला आहे. धरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पाटील सखोल तपास करीत आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात असून आरोपीची ओळख पटविण्यासाठी सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. सध्या या घटनेमागील खरा हेतू अस्पष्ट आहे. हा वैयक्तिक वैमनस्याचा परिणाम होता की, एखाद्या कृतीचा बदला होता, या मुद्यांचा पोलिस तपास करीत आहे. तपास पूर्ण झाल्यावरच संपूर्ण कहाणी समोर येईल. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी वसाहतीमधील अशा घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.