स्वतंत्र भारतीय मानसशास्त्र विकसित व्हावे

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी वक्त केली गरज
-सन्मार्ग माईंड वेलनेसचे लोकार्पण
 
नागपूर, 
Dr. Mohanji Bhagwat सध्या मानसशास्त्राचा अभ्यास पाश्चात्त्य देशांत विकसित झालेल्या संकल्पनांवर आधारित आहे. त्यामुळे स्वतंत्र भारतीय मानसशास्त्र विकसित करण्याची गरज रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे वक्त केली. आसाम हॉस्पिटलच्या सन्मार्ग माईंड वेलनेसचे लोकार्पण रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत झाले. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, संचालक डॉ. सुलेमान वीरानी, डॉ. निखिल पांडे, डॉ. श्रीकांत निंभोरकर, डॉ. सागर चिद्दरवार, डॉ. आभा बंग-सोनी, डॉ. अभिषेक मामर्डेे हेसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होतेे.
 
Mohan ji
 
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, नव्या पिढीत एकटेपणा वाढत आहे. पूर्वी ग्रंथवाचनातून मानसिक बळ मिळत होते. घरातील आजी-आजोबा मुलांना कथा सांगत असल्याने त्यांच्या मनावर चांगले संस्कार होत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. बारावीत नापास झाल्यामुळे आत्महत्या करणे, घरात रागावल्याने घर सोडून जाणे किंवा आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेण्याच्या घटना वाढत आहेत. मुलगा रडला की त्याच्या हातात मोबाईल दिला जातो, त्याला गुगलच्या हवाली केले जाते. त्यामुळे नवीन पिढीत एकटेपणा वाढत आहे. हा एकटेपणा दूर करण्यासाठी कुटुंबात संवाद वाढविण्याची गरज आहे.
 
 
स्वास्थ्यासाठी शरीरासोबत मनाचे स्वास्थ्यही तितकेच आवश्यक असते. शरीर बिघडले की शरीर कमकुवत होते व त्याचा परिणाम मनावरही होतो. अस्वस्थ असलेली व्यक्ती लवकर रागावते, ही बाब आता वैद्यकीय क्षेत्रालाही लक्षात येऊ लागली आहे. आजारी रुग्ण बरा होण्यासाठी मानसिक आरोग्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मनाचा अभ्यास आवश्यक असून त्यासाठी मानसशास्त्र आहे. भारतीय परंपरेत मनाच्या अनुभवाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. मनुष्याच्या विकासात मनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने मनाची चिंता करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मानसशास्त्राचा अभ्यास पाश्चात्त्य देशांत विकसित झालेल्या संकल्पनांवर आधारित आहे. त्यामुळे स्वतंत्र भारतीय मानसशास्त्र विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी संचालक डॉ. निखिल पांडे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. नागपूरसह विदर्भातील वैद्यकीय, सामाजिक वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.