रायपूर
dr teejan bai छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला 'पंडवानी'ला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या डॉ. तीजन बाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून त्या गंभीर आजारामुळे रायपूर एम्समध्ये उपचार घेत होत्या. आज पहाटे सुमारे ३.१५ वाजता त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावात १९५६ साली जन्मलेल्या डॉ. तीजन बाई यांचा जीवनप्रवास संघर्ष, जिद्द आणि कलेप्रती असलेल्या अविचल निष्ठेचा होता. महाभारतातील पात्रांना आपल्या लोककलेतून जिवंत करणाऱ्या त्यांनी पारंपरिक रुढी-परंपरांना धैर्याने आव्हान दिले. ज्या काळात पंडवानी गायनाच्या 'कापालिक शैली'वर केवळ पुरुषांचे वर्चस्व होते आणि महिलांना केवळ बसून गायन करण्याच्या 'वेदमती शैली'चीच परवानगी होती, त्या काळात त्यांनी सर्व बंधने झुगारून उभे राहून आपल्या खणखणीत आवाजात पंडवानी सादर करण्यास सुरुवात केली. या निर्णयामुळे सुरुवातीला त्यांना समाजाकडून तीव्र विरोध आणि बहिष्कारालाही सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी आपल्या कलेशी कधीही तडजोड केली नाही.हातात तंबोरा घेऊन त्या जेव्हा रंगमंचावर उभ्या राहत, तेव्हा त्यांच्या प्रभावी अभिनयातून कधी भीमची गदा, कधी अर्जुनाचा रथ, तर कधी द्रौपदीचे मोकळे केस साकारत महाभारतातील प्रसंग प्रेक्षकांसमोर जिवंत उभे राहत आणि रसिक मंत्रमुग्ध होत असत.
गेल्या पाच दशकांहून dr teejan bai अधिक काळ त्यांनी आपल्या कलेच्या बळावर छत्तीसगडची लोकपरंपरा देशाबरोबरच आशिया, युरोप, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंडसह जगभर पोहोचवली. ज्येष्ठ रंगकर्मी हबीब तनवीर यांनी त्यांच्या कलेची दखल घेतल्यानंतर त्यांचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले. दूरदर्शनवरील श्याम बेनेगल दिग्दर्शित 'भारत एक खोज' या गाजलेल्या मालिकेतही त्यांनी महाभारतावरील प्रसंगांचे सादरीकरण केले होते.
भारतीय लोकसंस्कृती आणि कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविले. त्यामध्ये पद्मश्री (१९८८), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९५), पद्मभूषण (२००३), जपानचा फुकुओका पुरस्कार (२०१८) आणि पद्मविभूषण (२०१९) या सन्मानांचा समावेश आहे.
डॉ. तीजन बाई यांच्या निधनाबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने लोककलेच्या क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून भारतीय लोककलेचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांनी घडविलेली कलाकारांची नवी पिढी आणि त्यांचा खणखणीत आवाज रसिकांच्या स्मरणात कायम जिवंत राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.