मुंबई
eetha movie प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘ईठा’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र हा वाद सिनेमातील मजकूर, गाणी किंवा कोणत्याही प्रसंगामुळे नसून, थेट त्याच्या शीर्षकावरून निर्माण झाला आहे. या चित्रपटाला ‘ईठा’ हे नाव देऊन तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप काही आक्षेपकर्त्यांनी केला असून, चित्रपटाचे नाव बदलण्याची जोरदार मागणीही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याची चर्चा सुरू असतानाच विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित विठाबाई नारायणगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मोहित यांनी या वादावर सविस्तर भूमिका मांडली आहे. चित्रपटाच्या शीर्षकाबाबत सुरुवातीला कुटुंबातही काही चिंता असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांनी सांगितले की, निर्मात्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर त्या शंका दूर झाल्या. मोहित यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाने अशी विनंती केली होती की चित्रपटाचे नाव ‘ईठा’ऐवजी थेट ‘विठाबाई नारायणगावकर’ असे असावे. मात्र निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपली बाजू समजावून सांगितल्यानंतर त्यांचे स्पष्टीकरण पटण्यासारखे वाटले.मोहित यांनी पुढे सांगितले की, निर्मात्यांचे म्हणणे असे होते की ग्रामीण महाराष्ट्रात विठाबाई यांना आजही अनेकजण ‘ईठा’ या नावानेच ओळखतात. हे ऐकल्यानंतर कुटुंबाच्या मनातील शंका दूर झाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पष्टीकरणामुळे समाधान झाल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्र आणि त्याच्या सांस्कृतिक मुळांचा प्रामाणिकपणे पडद्यावर आलेला आविष्कार दाखविल्याबद्दल चित्रपट निर्मात्यांचे कौतुकही केले.मोहित यांनी चित्रपटाविषयी विश्वास व्यक्त करताना म्हटले की, हा चित्रपट अतिशय सुंदर पद्धतीने साकारण्यात आला आहे. त्यांच्या मते, चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक असे म्हणतील की तमाशा परंपरा आणि मराठी संस्कृतीचे वारसदार योग्य पद्धतीने eetha movie पडद्यावर मांडले गेले आहेत. प्रेक्षक हा चित्रपट मनापासून स्वीकारतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी नारायणगाव येथे मोठा उत्साह असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मोहित यांच्या माहितीनुसार ‘ईठा’ चित्रपटाची टीम, ज्यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरचाही समावेश आहे, चित्रपट प्रदर्शित होण्याआधी नारायणगावला भेट देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.