आला पावसाळा आहार सांभाळा

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
nutritious-food-during-monsoon : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे हंगामानुसार उपलब्ध ताजे व स्थानिक अन्नपदार्थ खाणे. या ऋतूत निसर्ग आपल्याला शरीराला आवश्यक पोषण देणारे ताजे, स्थानिक व पौष्टिक अन्न भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देतो.
 
 
nutritious-food-during-monsoon
 
पावसाळ्यात हवामान आल्हाददायक असले तरी हवेतील वाढती आर्द्रता, तापमानात सतत बदल परिणामी संसर्गाचा धोका वाढून पचनावर परिणाम होऊ शकतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते. भाजलेले ताजे मक्याचे कणीस. त्यात भरपूर तंतुमय घटक, आवश्यक जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्स असल्याने पचन चांगले ठेवण्यास मदत होऊन शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
 
जांभूळ, नाशपती, आलूबुखार, पीच व डाळिंब यासारख्या हंगामी फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स असतात. ती खाण्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व हंगामी आजारांपासून संरक्षण मिळते, असे मत आहार तज्ञ स्वाती अवस्थी यांनी व्यक्त केले.
 
 
जांभूळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास व पचन सुधारण्यास उपयुक्त आहे. हिरव्या पालेभाज्या नीट स्वच्छ धुवून व चांगल्या प्रकारे शिजवूनच खाव्यात. उघड्यावर विकले जाणारे रस्त्यावरील खाद्यपदार्थ, कापून ठेवलेली फळे व बराच वेळ साठवून ठेवलेले अन्न खाणे टाळावे.
पचन, रक्ताभिसरण व एकूण आरोग्यासाठी कोमट पाणी, घरचे सूप, हर्बल चहा, नारळपाणी व ताजे तयार केलेले पेय यांचा आहारात समावेश करावा. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहते व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पावसाळा म्हटला की गरमागरम चहा व भजी यांची आठवण येते. असे आवडीचे पदार्थ अधूनमधून व मर्यादित प्रमाणात खावेत. रोजच्या आहारात ताजे, संतुलित व पौष्टिक अन्नाचा समावेश असल्यास पावसाळ्याचा आनंदही घेता येईल व आरोग्यही चांगले राहील.
 
ताजे, गरम व घरचे शिजवलेले अन्न
 
पावसाळ्यात ताजे, गरम व घरचे शिजवलेले अन्न खाणे सर्वात योग्य ठरते. भाजीची खिचडी, डाळ-भात, सूप, वाफवलेल्या इडल्या, पोहे, उपमा व घरचे भाजीचे पराठे हे पदार्थ चविष्ट, पौष्टिक व पचायला हलके असतात. हे पदार्थ शरीराला संतुलित पोषण देतात. दमट हवामानामुळे संवेदनशील होणाऱ्या पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊ देत नाहीत.
 
 
रोजच्या आहारात आले, हळद, लसूण, काळी मिरी, दालचिनी व जिरे यांसारख्या मसाल्यांचा समावेश केल्यास आरोग्याला अधिक फायदा होतो. या मसाल्यांमध्ये नैसर्गिक जंतुनाशक व दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे अन्नाची चव वाढण्याबरोबरच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास व संसर्गापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.