२० राज्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट; मुंबई-ठाण्यास रेड अलर्ट

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
red alert for mumbai and thane देशभरात नैऋत्य मान्सूनने वेग घेतला असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. काही भागांत अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, भारतीय हवामान विभागाने दिल्लीसह देशातील २० राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
red alert for mumbai and thane
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, गुजरात, तामिळनाडू, झारखंड, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आंध्र प्रदेश, केरळ, मिझोराम आणि त्रिपुरा या २० राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ५ आणि ६ जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
 
उत्तर प्रदेशात मान्सूनचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रयागराज, कौशांबी, फतेहपूर, चित्रकूट, आग्रा, वाराणसी, देवरिया, बलिया, सोनभद्र आणि मिर्झापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ९ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्येही पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सिवान, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, दरभंगा आणि समस्तीपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
राजस्थानमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. झालावाड, बांसवाडा आणि डुंगरपूर येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून जयपूर, जोधपूर, अजमेर, उदयपूर, बिकानेर आणि चुरूसह अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. याशिवाय अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही ७ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा कायम आहे.
 
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये बंगालच्या उपसागरातील बदललेल्या हवामानामुळे कोलकातासह दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मेदिनीपूर, पुरुलिया आणि बांकुरा जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.