भरकटणाऱ्या भविष्याचे भय

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
रोखठोक…
दिनेश गुणे
Indian youth बेभरवशी आणि अनिश्चित आयुष्य वाट्याला येण्याची जी काही कारणे आजकालच्या युवा पिढीसमोर आव्हान होऊन उभी राहिली आहेत, त्यामध्ये बेरोजगारी, गरीबी आणि अंधारमय भविष्याचे भय या कारणांचा महत्वाचा वाटा आहे. कोणाही युवकाच्या उमेदीच्या वयात त्याच्या नजरेसमोर एका सुखी, समाधानी भविष्याचे स्वप्न तरळत असते. ते स्वप्न साकार व्हावे यासाठी त्याचे सदैव प्रयत्न सुरू असतात. त्या ध्येयाने पछाडलेला प्रत्येक युवक त्यासाठी स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो, आणि अशी पात्रता प्राप्त झाल्याचा विश्वास मनात रुजला, की भविष्याचे स्वप्न मुठीत पकडण्याचा प्रयत्न सुरू करतो. हा त्याच्या आशावादाचा काळ असतो. या काळात नशीब सोबत असेल, तर त्याचे भविष्य उजळते, आणि एखाद्या बेसावध क्षणाची शिकार होऊन नशिबाचे फासे उलटे पडलेच, तर मात्र त्याला अनिश्चित आणि बेभरवशी आयुष्याच्या खडतर वाटचालीशी सामना करावा लागतो. आपल्या आसपास अशा हजारो तरुणांच्या फौजा भविष्य घडविण्याची साधने हाती मिळविण्यासाठी धडपडत असताना आणि त्यासाठी कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्याची मानसिक व शैक्षणिक तयारी करत असताना, त्यांना गळाला लावून त्यांची पिळवणूक करण्याचा एक अमानवी धंदा गेल्या काही दशकांपासून देशात आणि बहुधा जगातील अनेक देशांत सुरू आहे. मानवी तस्करी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अमानवी धंद्याची शिकार होणाऱ्यांमध्ये केवळ तरुणच नव्हेत, तर बालके, महिलांचीदेखील अमानुष पिळवणूक होत असून भविष्य तर पुसले जातेच, पण वर्तमानाविषयीच्या अपेक्षांचाही चक्काचूर होऊन त्यांची आयुष्ये केवळ भकास होतात. अशी अनेक प्रकरणे देशाच्या कानाकोपऱ्यात उघडकीस येऊ लागली असून त्यांचे बळी ठरलेल्यांना न्याय मिळावा यासाठी अधूनमधून उमटणारे आवाजदेखील दुबळे ठरावेत अशा ताकदीने हा अमानवी व्यवहार अखंडपणे सुरू आहे. गेल्या काही दशकांत हजारो माणसे या तस्करीला बळी पडून उद्‌ध्वस्त झाली. त्यांचे भविष्य तर संपलेच, पण मानवी समूहाशी असलेल्या त्यांच्या नात्यांचे धागेदेखील तोडून मानवी जगाच्या या अनैतिक व्यवहारांनी त्यांचा अक्षरशः मानसिक बळी घेतला आहे.
 
 
indian yuth
 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या वेबसाईटवर एक विशेष पान पाहावयास मिळते. या पानांवरील मजकूर धक्कादायक आहेच, पण ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून दिवसागणिक अधिक गंभीर होत चालली आहे याचीही या मजकुरावरून जाणीव होते. अनिवासी भारतीय व्यक्तींसोबतच्या विवाहातून उद्‌भवलेल्या या समस्येत गेल्या काही वर्षांत ४० हजारांहून अधिक महिलांच्या आयुष्याची अक्षरशः धूळधाण झाली असून त्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. यापैकी अनेक महिला न्यायासाठी झगडत आहेत, तर अनेकींनी न्यायाची अपेक्षादेखील सोडून दिली आहे. मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर या समस्येची सोडवणूक करण्यासाठी प्रत्यक्षात गांभीर्याने काही हालचालींवर झाल्या. दिवंगत सुषमा स्वराज या परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना काही समस्याग्रस्त महिलांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली गेली, आणि अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने हा विशेष अनिवासी भारतीय कक्ष सुरू केला. देशाच्या अनेक भागांतील महिलांचे भविष्य या प्रकारात अस्थिर झालेच, पण विशेषतः पंजाबमधील ३५ हजारांहून अधिक महिलांची परदेशात नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांसोबत संसार थाटण्याची व सुखी जीवनाची स्वप्ने उद्‌ध्वस्त झाली आहेत. या महिलांना त्यांच्या अनिवासी पतीने बेकायदेशीरपणे किंवा फसवणूक करून वाऱ्यावर सोडले आहे. परदेशातील कायद्यांचा अपुरा आधार, कायद्याविषयीचे अज्ञान, सामाजिक प्रतिष्ठेपोटी वाच्यता न करण्याची मानसिकता यामुळे या महिला कुढत राहिल्या आहेत. आपल्या मुलीला परदेशातील संपन्न आयुष्य जगणारा पती मिळावा आणि तिचे भविष्य उजळावे या आशेने अनेकदा आईवडील घाईघाईने मुलीचा विवाह एखाद्या अनिवासी मुलाशी लावून देतात आणि लग्नानंतर काही दिवसांतच परदेशी परतलेला पती आपल्या पत्नीशी संपर्कच तोडून टाकतात. अशा प्रकरणांत लग्नातून मिळालेला हुंडा व भरमसाठ संपत्ती लुटण्याचा स्वार्थी हेतू असतो, हे उघड आहे. एकदा संपत्ती आणि पैसा हाती आला, की अनिवासी पती परदेशात पळून जातो, वधू माहेरी अडकून पडते आणि पतीने सोडून दिलेली महिला असा सामाजिक कलंक माथी घेऊन या महिला आपले आयुष्य ढकलत राहतात. परदेशातील कायदे वेगळे असल्यामुळे घटस्फोट घेणे, पोटगी मागणे किंवा न्याय मिळविणेदेखील अवघड होते. त्यामुळे, फसवणूक झालेल्या महिलांनी भारतात तक्रार नोंदवली तरी आरोपी पतीचा शोध घेऊन त्याला भारतात परत आणणे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे या प्रक्रिया क्लिष्ट होतात, आणि बनावट विवाहाद्वारे संपत्तीची लूट करून आयुष्ये उद्‌ध्वस्त करण्याचा खेळ सोपा होतो… काही तरुण विवाहानंतर पत्नीस परदेशात घेऊन जातात आणि तेथे वेठबिगारीची कामे करण्यास भाग पाडतात असेही काही प्रकरणांत उघडकीस आले आहे. पंजाबमध्ये गेल्या काही वर्षांत सुमारे ३२ हजार महिलांना अनिवासी पतींनी सोडून दिल्याची धक्कादायक माहिती गेल्याच महिन्यात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पंजाबमधील एका कार्यक्रमात बोलताना उघड केली. एकट्या पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारा हा अनिवासी विवाह घोटाळा आटोक्यात आणणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान बनले आहे.
 
 
पंजाबमधील अकालगढ येथील ही घटना अशा घोटाळ्याचे अस्तित्व अधोरेखित करणारी ठरते. अकालगढमधील एका कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह जर्मनीतील हॅम्बर्ग येथे राहणाऱ्या एका अनिवासी तरुणाशी ठरविला. विवाहानंतर आपल्या मुलीला जर्मनीत चांगले जीवन जगता येईल या आशेने हुंड्यासाठी सुमारे आडेआठ हजार डॉलर्सची रक्कम कर्ज घेऊन उभी केली, आणि सोने, कपडे, महागडे फर्निचर भेट देऊन थाटामाटात विवाह सोहळा साजरा केला. लग्नानंतर लवकरच कागदपत्रांची आणि आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करून पत्नीला घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन पती जर्मनीस निघून गेला, आणि माहेरी राहिलेली पत्नी पतीच्या प्रतीक्षेत जीवन जगू लागली. आपल्याशी विवाह केलेल्या तरुणाचे जर्मनीत लग्न झाले आहे आणि त्याला पत्नी व मुलेही आहेत, ही बाब लग्नानंतर आठ वर्षांनी तिला समजली, तेव्हा मानसिक धक्क्याने ती कोलमडून गेली होती. आता त्यांनी आपल्याला फसविणाऱ्या त्या अनिवासी व्यक्तीविरुद्ध पंजाबमधील एका न्यायालयात खटला दाखल केला आहे, आणि न्यायाच्या प्रतीक्षेत त्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवत प्रत्येक दिवस ढकलत आहेत.
 
 
एका बाजूला माणसांसोबत असे अमानवी वर्तन करून आर्थिक फसवणुकीचा धंदा करणाऱ्या अनिवासी व्यक्तींचे गुन्हे आव्हान म्हणून उभे असताना, संघटितपणे सुरू असलेली मानवी तस्करी हा मानवतेला लागलेला शाप पुसण्याचे आव्हानही अधिक खडतर होत आहे. यामागे मोठ्या आर्थिक उलाढालीत गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने त्यांचा संपूर्ण बीमोड करणे अद्याप तरी शक्य झालेले नाही, त्यामुळे या धंद्याच्या जाळ्यात अडकलेल्यांचे भविष्य अक्षरशः वाऱ्यावर भरकटते, आणि एखाद्या नशीबवानासच पुन्हा आपल्या आयुष्याची भरकटलेली दिशा पूर्वपदावर आणण्याची संधी मिळते. मानवी तस्करीमागे अनेक उद्देश असतात, आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात तस्करीच्या जाळ्यात अडकलेल्या माणसांची वस्तूच्या मोलाने खरेदी-विक्री होऊन त्यांचा वापर पुढे अनैतिक व बेकायदा आर्थिक गुन्हेगारीकरिता केला जातो हे आता गुपित राहिलेले नाही. आता या गुन्हेगारीला आणखी एक नवा मार्ग सापडला आहे. बेरोजगारीच्या आणि कौटुंबिक समस्यांच्या त्रासाने स्वास्थ्य हरवलेल्या तरुणांच्या फौजा जेव्हा भविष्याच्या शोधात भरकटत असतात, तेव्हा त्यांच्यावर आमिषांचे जाळे टाकून त्यांना भविष्याची सुंदर स्वप्ने दाखविणे आणि पुढे गळाला लागलेल्या प्रत्येकाची पिळवणूक करून त्यांच्या अस्तित्वाच्या खुणादेखील अनोळखी करून टाकणे हा या नव्या धंद्याचा राक्षसी मार्ग आहे, आणि भविष्याच्या स्वप्नपूर्तीच्या आशेने किंवा अन्य कोणत्याही कारणाने एखाद्या बेसावध क्षणी त्यावर भरकटलेल्या असंख्य महिला, मुले, तरुणांची आयुष्ये उद्‌ध्वस्त झाली आहेत.
 
 
विकासाच्या स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. तरीही या राज्यालादेखील मानवी तस्करीच्या भीषण समस्येचा मोठा डाग लागला आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी, मार्च २०२३ मध्ये देशाच्या लोकसभेतील कामकाजादरम्यानच्या चर्चेतून समोर आलेले एक वास्तव या चितेंला पुष्टी देणारे आहे. त्याआधीच्या तीन वर्षांतील महाराष्ट्रातील मानवी तस्करीच्या उघडकीस आलेल्या प्रकरणांची एक गंभीर आकडेवारीच त्या दिवशी लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सभागहासमोर मांडली. राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेचा अहवाल हा या आकडेवारीचा अधिकृत स्रोत असल्याने, या वास्तवाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. सन २०२१ च्या अहवालानुसार त्याआधीच्या तीन वर्षांत महाराष्ट्रात मानवी तस्करीच्या सुमारे ७८५ प्रकरणांची नोंद झाली होती. सन २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत, देशभरातील १८ वर्षांखालील दोन लाख १० हजार मुले मानवी तस्करीच्या जाळ्यात सापडली, तर १८ वर्षांवरील सुमारे पाच लाख ८० हजार महिलांना या अमानवी धंद्याची शिकार व्हावे लागले. लैंगिक शोषण हा या अमानुष धंद्यामागचा भीषण हेतू आहे हे स्पष्ट आहेच, पण गरीब, बेरोजगारांना लक्ष्य करून त्यांचा गुन्हेगारी धंद्यांसाठी वापर करण्याचे प्रकारही वाढले आहेत. परदेशात नोकरी मिळविण्याच्या आशेने व भविष्याच्या स्वप्नांच्या प्रभावाने हुरळलेले तरुण अशा अमिषांना बळी पडतात, परदेशी जाण्यासाठी हाती असलेली पुंजी खर्च करतात, आणि या टोळ्यांच्या माध्यमातून परदेशात दाखल झाल्यानंतर पैसा, पासपोर्ट, पत्ता असे स्वतःची ओळख असलेले सारे काही गमावून बसतात. अशा आमिषाने जाळ्यात पकडलेल्या भारतीय तरुणांना परदेशांतील अज्ञात ठिकाणी ओलीस ठेवून त्यांना सायबर गुन्हेगारी भाग पाडल्याची असंख्य उदाहरणे यापूर्वी उघडकीस आली होती. कंबोडियामध्ये पाच हजारांहून अधिक भारतीय तरुणांना या गुन्हेगारीसाठी ओलीस ठेवून राबविले गेल्याची एक बातमी दोन वर्षांपूर्वी देशात चिंतेची लाट पसरवून गेली होती, तर रशियामध्ये हेल्पर म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून तस्करी मार्गाने रशियास पाठविलेल्या तरुणांच्या हाती शस्त्रे देऊन त्यांना सक्तीने युक्रेन युद्धात पाठविले गेल्याचेही उघड झाले होते. दोन वर्षांपूर्वी, जुलै २०२४ मध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी लोकसभेतच ही माहिती दिली होती. अनैतिक लैंगिक धंद्याकरिता महिलांची तस्करी, भीक मागण्यासाठी किंवा अमली पदार्थांची नेआण करण्यासाठी बालकांची तस्करी होत असल्याचे प्रकार तर सतत कानावर येतच असतात. म्हणूनच, मानवी तस्करीच्या या भयावह धंद्याचे आंतरराष्ट्रीय जाळे भेदून सामान्य जनतेस सुरक्षित आणि भयमुक्त जगण्याची हमी देण्याचे आव्हान आता सोपे राहिलेले नाही.
 
 
कंबोडिया, म्यनमार आदी देशांत सायबर गुन्हेगारीकरिता भारतीय तरुणांची मोठ्या प्रमाणावर तस्करी झाल्याची कबुली गेल्या फेब्रुवारीत लोकसभेत सरकारने दिली, आणि या आव्हानाच्या मर्यादाही उघड झाल्या. आमिषांना बळी पडून अशा नोकऱ्यांच्या आकर्षक फसव्या जाहिरातींकडे आकर्षित होणारे तरुण स्वतःहूनच दलालांच्या जाळ्यात ओढले जातात, आणि आपले भविष्य पणाला लावतात, त्यामुळेच हे आव्हान सोपे नाही, याची सरकारला जाणीव आहे. सन २०२२ मध्ये सुमारे साडेचारशे, २०२३ मध्ये सुमारे साडेपाचशे आणि २०२५ मध्ये सुमारे चार हजार ३०० भारतीय तरुणांची या दमनचक्रातून मुक्तता करण्यात आली असली, तर नव्याने पुन्हा या जाळ्यात अडकून आपले भविष्य अंधारात ढकलणाऱ्या तरुणांचे आव्हान कायम आहे. म्यानमार हे अशा तस्करीचे मोठे केंद्र असावे असे या आकडेवारीवरून दिसते. मात्र, या गुन्ह्याचे जाळे तेवढ्यापुरते मर्यादित नाही, हे थायलंड-म्यानमार सीमेवरील एका अज्ञात छावणीत डांबल्या गेलेल्या सुमारे ८०० भारतीय तरुणांच्या नव्याने समोर आलेल्या करुण कहाणीवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. थायलंडमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसविल्या गेलेल्या या ८०० तरुणांमध्ये महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील सुमारे २५ तरुणांचा समावेश असल्याने, महाराष्ट्राच्या तरुणांसमोरील समस्यांचे एक गंभीर चित्र या नव्या प्रकरणातून समोर आले आहे. बीड जिल्ह्याच्या केज या गावातील एका तरुणास बँकॉकमधील लठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष खुणावू लागले, आणि तो या जाळ्यात अडकला. बँकॉकमध्ये पोहोचल्यावर त्याला म्यानमारमधील एका जंगलातील अज्ञात स्थळी असलेल्या सायबर गुन्हेगारी केंद्रात ऑनलाईन फसवणुकीच्या कामाला जुंपण्यात आले. एक संधी साधून या तरुणाने आपल्या कुटुंबासोबत संपर्क साधल्याने या नरकयातनांचा आणि आंतरराष्ट्राय तस्करीचा उलगडा झाला आहे. आता त्यांच्या सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करतील, आणि या अमानवी धंद्याचे दलाल नवे जाळे घेऊन गरजवंतांच्या स्वप्नांना त्यामध्ये गुरफटविण्यासाठी तयारी करतच राहतील. तरुणांना आणि सुखी भविष्याच्या स्वप्नात दंग राहून आंधळेपणाने कोणाच्याही गळ्यात माळ घालत स्वतःची फसवणूक करून घेणाऱ्या विविहेच्छु तरुणींच्या कुटुंबाना केवळ सावध करणे एवढाच अशा अमानवी धंद्याला आळा घालण्याचा उपाय पुरेसा नाही. तरुणांना आणि भविष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणींना त्यांच्या क्षमता सिद्ध करता येतील अशा रोजगाराच्या संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. ते शक्य होईल, तेव्हा मानवी तस्करीच्या आणि फसवणुकीद्वारे संपत्ती जमवून परदेशात सुखाने राहात अनेक महिलांची आयुष्ये उद्‌ध्वस्त करणाऱ्या अमानवी धंद्याचे आव्हान पेलणेही सोपे होईल.