भारताची पासपोर्ट रँकिंगमध्ये घसरण

यादीत युरोपचा दबदबा कायम, स्वीडन अव्वलस्थानी

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
न्यू यॉर्क, 
indias-passport-ranking-drops : जागतिक पासपोर्ट निर्देशांकात (पारपत्र निर्देशांक) भारताची एका स्थानाने घसरण होऊन तो १२५ व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षी भारत १२४ व्या क्रमांकावर होता. यादीत युरोपियन देशांचा दबदबा असून, स्वीडनने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत पहिल्या १० देशांमध्ये सिंगापूर हा केवळ एकच आशियाई देश आहे.
 
 
 
 
indias-passport-ranking-drops
 
 
 
ग्लोबल सिटिझन सोल्यूशन्स (जीसीएस) ने प्रसिद्ध केलेल्या पाचव्या वार्षिक अहवालानुसार, नामिबिया १२४ व्या स्थानावर असून भारताच्या पुढे आहे, तर अझरबैजान १२६ व्या स्थानावर आहे. जागतिक पासपोर्ट निर्देशांक जागतिक गतिशीलता, गुंतवणुकीची क्षमता आणि जीवनमान यावर आधारित पासपोर्टची ताकद विचारात घेतो. या क्रमवारीत १९७ देशांपैकी भारत १२५ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारत १२४ व्या क्रमांकावर होता. २०२१ मध्ये तो १२७ व्या क्रमांकावर होता. २०२१ पासून आतापर्यंतची कामगिरी पाहता, भारताच्या स्थानात दोन निर्देशांकाने सुधारणा झाली आहे. इतकेच नाही, तर भारताचा एकत्रित स्कोअर देखील ४५.१ वर पोहोचला आहे. अहवालानुसार, भारत २६ देशांतील लोकांना व्हिसा-मुक्त प्रवेश देतो. यामध्ये भूतान, जमैका, मकाऊ, नेपाळ, पॅलेस्टाईन, ट्युनिशिया आणि अंगोला यांचा समावेश आहे.
८८ देशांत प्रवेशासाठी व्हिसा आवश्यक
 
अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, चीन, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या ८८ देशांना भेट देण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसाची आवश्यकता आहे. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स क्रमवारीसाठी तीन मुख्य मापदंडांचा वापर करण्यात आला. यात वाढीव गतिशीलता (५० टक्के), गुंतवणूक (२५ टक्के) आणि राहणीमानाचा दर्जा (२५ टक्के) या तीन घटकांचा समावेश आहे. जागतिक निर्देशांकात स्वीडन अव्वल स्थानी आहे, त्यानंतर स्वित्झर्लंड, फिनलंड, जर्मनी, नेदरलँड्स, डेन्मार्क, आयर्लंड, युनायटेड किंगडम, नॉर्वे आणि सिंगापूर यांचा क्रमांक लागतो. भारताचा शेजारी देश चीन या क्रमवारीत १०४, बांगलादेश १६६ ,नेपाळ १६४ आणि पाकिस्तान १८८ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सर्वात कमी क्रमांकाच्या देशांपैकी एक आहे. अमेरिका आणि फ्रान्स दोन्ही ११ व्या क्रमांकावर आहेत. कॅनडा १३ व्या क्रमांकावर आहे. सोमालिया, दक्षिण सुदान, येमेन आणि सीरिया हे जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशांपैकी आहेत. एरिट्रिया १९३ व्या क्रमांकावर आहे आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक १८९ व्या क्रमांकावर आहे.
  
भारताचा पासपोर्ट कमकुवत का झाला ?
 
 
भारताचा पासपोर्ट कमकुवत होण्यामागे त्याच्या मोबिलिटी स्कोअरला जबाबदार धरले जात आहे. २०२१ मधील १८ व्या स्थानावरून २०२६ मध्ये २३ व्या स्थानापर्यंत त्यात सुधारणा झाली आहे. दरम्यान, इतर देशांमध्ये प्रवासाची सोय झपाट्याने वाढली आहे. परिणामी, एकूण क्रमवारीत भारताला फटका बसला आहे. पहिल्या १० देशांमध्ये सिंगापूर हा एकमेव आशियाई देश आहे. गतिशीलता आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सिंगापूरचा पासपोर्ट लक्षणीयरीत्या पुढे आहे.