जळगाव
jalgaon accident news जळगाव जिल्ह्यातील पारोळा–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सबगव्हाण टोल नाक्यावर आज सकाळी गॅस टँकरचा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेनंतर टँकरला अचानक आग लागून मोठा आगीचा भडका उडाला. या अपघातात टँकरमधील चालक आणि क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस टँकरने टोलनाक्यावरील दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर काही क्षणांतच टँकरने पेट घेतला. धडकेचा जोर इतका भीषण होता की टँकरचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे गॅस टँकरचा स्फोट होण्याची मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.या अपघातामुळे आणि लागलेल्या आगीमुळे सुमारे दोन ते तीन तास महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.