पंढरपूर
jalna paratpur accident लग्नकार्य आणि देवदर्शन आटोपून पंढरपूरहून बुलढाणा जिल्ह्याकडे परतणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला जालना जिल्ह्यातील परतूरजवळ भीषण अपघात झाला आहे. परतूर परिसरातील दुधना नदीच्या पुलावर ही ट्रॅव्हल्स नियंत्रण सुटल्याने पलटी झाली असून या दुर्घटनेत बसमधील अंदाजे १२ ते १३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त सर्व प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते पंढरपूर येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्नकार्य पूर्ण करून तसेच विठ्ठलाचे दर्शन आटोपून आनंदाने आपल्या गावी ट्रॅव्हल्सने परतत असताना परतूरजवळील दुधना नदीच्या पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. यानंतर भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स पुलावरच पलटी झाली.अपघात इतका भीषण होता की बस पलटी होताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू आल्या. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि रस्त्यावरून जाणारे वाहनचालक तत्काळ घटनास्थळी धावले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत झाली.या दुर्घटनेत १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकांच्या सहाय्याने परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, अपघातामुळे दुधना नदीच्या पुलावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली असून अपघात नेमका कशामुळे घडला याचा पुढील तपास सुरू आहे.