दरवर्षी पाण्याखाली जाणारा पूल

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
करंजी सोनामाता गावाचा पुन्हा संपर्क तुटला

राळेगाव, 
Karanji Sonamata Bridge तालुक्यातील करंजी सोनामाता गावालगतच्या पुलावर मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने गुरुवारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने कोणताही अपघात होऊ नये म्हणून वाहनचालकांना तासन्तास थांबावे लागले. अनेक जणांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागला, तर काहींना जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
Karanji Sonamata Bridge
 
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार नवीन नाही. दरवर्षी पावसाळा सुरू होताच या पुलावरून पाणी वाहते आणि गावाचा संपर्क तुटतो. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला तसेच रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलालाही गावात पोहोचणे कठीण होते. विशेष म्हणजे, या पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून संबंधित विभागाकडे केली आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना याच संकटाचा सामना करावा लागत आहे.
 
 
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, एखादी जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आताच पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला प्रशासनाला सामोरे जावे लागू शकते. विकासाच्या गप्पा करणाचे प्रशासन करंजी सोनामाता गावातील या पुलाकडे कधी लक्ष देणार, असा संतप्त प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.