पुणे
siya goyal बांधकाम व्यावसायिक आणि तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कथित हत्याप्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात काल वडगाव मावळ सत्र न्यायालयात सुनावणी झाली असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळली.
सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, सियाचा दुसरा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्यातील डिलिट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. या डेटामध्ये सिया आणि चेतन यांच्यातील संभाषणात सांकेतिक भाषेचा वापर असल्याचा दावा करत, त्या संवादाचे विश्लेषण आणि डिकोडिंग करण्यासाठी दोघांना वाढीव पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच दोघांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचेही सरकारी पक्षाने कोर्टात सांगितले.
दुसरीकडे, आरोपींच्या वतीने वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सियाने तपासात पूर्ण सहकार्य केले असून पुढेही ती सहकार्य करेल. तसेच पोलिसांकडील उल्लेख केलेला मोबाईल आधीच जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईलमधील संदेश, कोड आणि सांकेतिक भाषा समजून घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही, असे बचाव पक्षाने न्यायालयासमोर मांडले.
या सुनावणीदरम्यान नार्को टेस्टबाबतही चर्चा झाली. न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींची सहमती असल्याशिवाय नार्को टेस्ट करता येत नाही. दरम्यान, सरकारी वकिलांनी सध्या नार्को टेस्टची आवश्यकता नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाढीव तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि सिया गोयल व चेतन चौधरी यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित डिजिटल पुरावे आणि चॅटिंग चर्चेत आले असून, सियाचे तिच्या मैत्रिणीसोबतचे कथित संभाषणही व्हायरल झाले आहे. त्यात तिने न होणाऱ्या लग्नाचा उल्लेख करत तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड मागितल्याचे समोर आले आहे. या चॅट्स, मोबाईल डेटा आणि इतर डिजिटल पुराव्यांचा न्यायवैद्यक शास्त्र अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच या पुराव्यांची कायदेशीर वैधता निश्चित होणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.