नागराज मंजुळेंचा ‘खाशाबा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

19 पुरावे न्यायालयात दाखल

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
मुंबई
khashaba movie दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टीझरमधील पाच दृश्ये लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील असल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणाने आता न्यायालयीन वळण घेतले आहे. पुणे दिवाणी न्यायालयाने या कॉपीराइट वादाची सुनावणी 10 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.
 

khashaba movie teaser controversy: copyright case against nagraj manjule reaches court, hearing adjourned to july 10 
लेखक संजय दुधाणे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकावर चित्रपटातील काही दृश्ये आधारित आहेत आणि त्यासाठी त्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यांनी 10 ऑक्टोबर 2024 रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे, निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रॉडक्शन्स यांच्याविरोधात कॉपीराइटचा दावा दाखल केला होता.
१९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्री-स्टाइल कुस्तीत कांस्यपदक जिंकून भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगितले जाते. मात्र, आपल्या पुस्तकातील मजकूर परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा दावा दुधाणे यांनी केला असून, प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहात टीझर प्रदर्शित झाल्याने संबंधित पक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयीने आयोगाने चित्रपट पाहावा आणि संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकाचे वाचन करून निर्णय घ्यावा, असा अर्ज वकील सुवर्णा शिंदे यांनी सादर केला आहे.
 
 
या प्रकरणाशी संबंधित 19 पुरावे khashaba movie  न्यायालयात सादर करण्यात आले असल्याचेही समोर आले आहे. यामध्ये टीझरवर आधारित 5 पुरावे, नागराज मंजुळे यांनी केलेल्या 5 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्यातील 4 पुरावे, तसेच रणजीत जाधव यांच्यासोबतच्या करारासंदर्भातील 6 पुरावे यांचा समावेश आहे. हे सर्व 14 पुरावे ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयात सादर केल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांच्या शपथपत्रात चित्रपटाची कथा ही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे पुरावे मंजुळे यांनी जोडल्याचा आरोप दुधाणे यांनी केला आहे. तसेच हा चित्रपट सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे तयार केल्याचेही शपथपत्रात नमूद असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यास जोडलेले काही संदर्भ हे प्रत्यक्षात दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
‘खाशाबा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, खाशाबांचे प्राचार्य, इंग्रज अधिकारी, बडोद्याचे माणिकराव, तसेच पंजाबी मल्लांवरील अन्याय, कुस्तीबरोबरच मल्लखांब आणि खो-खोतील अष्टपैलू खेळाडू अशा दृश्यांचा समावेश दिसून येतो. ही सर्व मांडणी आपल्या पुस्तकात नाट्यमयरित्या करण्यात आल्याचा दावा लेखक दुधाणे यांनी केला असून, हा केवळ योगायोग नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.